लोकसंस्कृती क्षेत्रात स्त्रीचं योगदान

0
400
  •  डॉ. जयंती नायक

स्त्रीनं कित्येक शतकांपासून संस्कृतीची गुडी उभारून धरलेली आहे. त्यामुळे गोव्यातील संस्कृतीचं एक भव्य चित्र समाजापुढे उभं राहतं. या कार्यात या भूमीवर बस्तान करून असलेल्या प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जाती-जमातींच्या स्त्रीचं चिमूटभर तरी योगदान आहेच, हे मुद्दाम नमूद करावे लागेल.

 

स्त्री आणि संस्कृती या दोघांचे एकमेकांशी अनन्यसाधारण नातं आहे. स्त्रीशिवाय संस्कृती आणि संस्कृतीशिवाय स्त्री अपूर्ण आहे. या दोघांचे हे संबंध आदिमकालापासूनचे. संस्कृतीच्या उगमापासूनच स्त्रीचं संस्कृतीशी नातं जुळलेलं आहे; किंबहुना स्त्रीच्या हस्तेच संस्कृतीचा उदय झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

संस्कृतीचा उद्गम हा शेतीच्या उगमातून झाला; आणि या उगमाची स्रोतदायिनी स्त्री आहे. वाघ्र अवस्था ही मानव विकासाची सुरुवातीची अवस्था. या अवस्थेत जीवन जगताना पुरुष शिकारीच्या मागे हिंडत असे आणि स्त्री एका जागी थांबून मुलांचा सांभाळ करीत असे. इथेच स्त्रीच्या कल्पकबुद्धीतून शेतीचा उगम झाला. निसर्गतः उगवलेल्या धान्याचे जमीन खणून बीज पेरले तर त्यातून जास्त धान्य मिळते हे तिने हेरले अन् तिने तसे करायला आरंभ केला. बर्नेल, गायल्स, ब्रिफो या जागतिक कीर्तीच्या विद्वानांनी शेतीचा शोध स्त्रीनेच लावला असा सिद्धांत मांडलेला आहे. शेतीसाठी जमीन खोदायला स्त्री एका टोकाळ काठीचा म्हणजे खननयष्टीचा वापर करायची. तिचं या क्षेत्रातील वर्चस्व नांगराचा शोध लागेपर्यंत राहिलं. नांगराच्या शोधाबरोबर पुरुषाचा या क्षेत्रात प्रवेश झाला अन् तिचं स्थानं हललं. मात्र पूर्ण नाहीसं झालं नाही. रोपणी, नडणी, कापणी, पाखडणी, कांडणं अशा कामातून तिचा शेतीशी संबंध अबाधित राहिला.
पिकाचं बीज भूमातेच्या उदरात पेरलं जातं तेव्हा ते रुजून वाढण्यासाठी तिच्या संमतीची, तसंच विपुल धान्य येण्यासाठी निसर्गातील पर्जन्य, हवा इत्यादी शक्तींच्या कृपेची गरज आहे हे त्याकाळी स्त्रीने ताडले अन् मग त्यांच्या कृपाभिलाषेने तिने काही आचार सुरू केले, काही तंत्र संपूर्ण केली. ‘सारख्यातून सारखे जन्माला येते’ या जादुतत्त्वानुसार भूमातेला, तसेच जगातील अदृश्य शक्तींना काही वस्तू अर्पण केल्या, काही कृती (नृत्यादी) सादर केल्या. इथेच संस्कृती या संकल्पनेचा पाया पडला. पुढे मानवी विकासाच्या दीर्घ पथावर त्यात शेकडो गोष्टी येऊन जोडल्या गेल्या. नव्या जुळत जाताना मौखिक परंपरेनं जुन्या प्रवाहित होत राहिल्या. याच्या परिणामातून एका विशाल अशा सांस्कृतिक गंगेचा जन्म झाला.

स्त्रीनं ज्या संस्कृतीरूपी गंगेला जन्माला घातलं त्या संस्कृतीचा प्रचार, प्रसार अन् संवर्धन करण्याचं कार्य प्रामुख्यानं तिनचं केलं. या भूमीवरील मूळ जी मातृप्रधान संस्कृती, त्या संस्कृतीत, त्याचबरोबर नंतरच्या पितृप्रधान संस्कृतीतही तिनंच त्याचा जिम्मा उचलला.
गोव्याच्या संदर्भानं बोलायचं तर स्त्रीनं हे कार्य दोन स्तरांवर केलेलं आहे, एक- सामाजिक स्तरावर, तर दुसरं कौटुंबिक स्तरावर. सामाजिक स्तरावर ‘धालो’, ‘कातयो’ आणि ‘धिल्लो’सारखे लोकोत्सव संपन्न करण्याची जबाबदारी तिनं भुजांवर पेललेली आहे. गोव्यात प्रामुख्यानं आदिवासी समाजात काल आणि आजही या उत्सवाचं माहात्म्य मानलं जातं. हे उत्सव भूमीच्या सुफलीकरणाशी संबंधित असून ते संपन्न झाले तरच पीक-पाणी विपुल होईल, स्त्रीच्या कुशी फळतील अशी धारणा आहे. धार्मिक त्याचबरोबर कलात्मक आविष्कार असलेले, तसेच गोमंतकीय लोकसंस्कृतीचा मोठा वारसा मानला जाणारे हे नृत्योत्सव शेकडो वर्षांपासून गावच्या मांडावर घडवून आणण्याचे कार्य या समाजातील स्त्री (स्त्रिया) करीत आलेली आहे. हे लोकोत्सव म्हणजे गोव्यातील आदिवासी स्त्रीच्या पारंपरिक कर्तबगारीचे मोठे प्रमाण आहे. यातील ‘धालो’ हा उत्सव संपूर्ण गोवाभर होतो. ‘धिल्लो’ हा काणकोण, केपे आणि सांगे तालुक्यांत होतो, तर ‘कातयो’ धारबांदोडा येथील ओकांब गावात आणि केपे तालुक्यातील गोकोळडे गावात होतो. मातृप्रधान परंपरेतून उदयाला आलेले हे लोकोत्सव, ज्यांचं पौरोहित्य स्त्रीकडेच आहे; पुरुषाला इथं स्थान नाही किंवा असेल तर ते दुय्यम स्वरुपातील.

या लोकोत्सवातून भूमीच्या सुफलीकरणाचे अन् स्त्रीचं पोट पिकण्याचेच आवाहन केले जाते असे नाही तर या उत्सवांतून लोकधर्माची जागृती आणि प्रसार होतो. लोकधर्माचे महत्त्व लोकमानसावर बिंबवले जाते. मूळ आदिवासींचा असलेला हा लोकधर्म निसर्गाशी जोडलेल्या समाजाचा आहे. ‘धालो’ आणि इतर दोन्ही उत्सवांतून निसर्गाचे, या पृथ्वितलावरील जीव-जंतूंचे, त्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व सांगितले जाते, ज्यातून पर्यावरण रक्षणाचे जाणता-अजाणता कार्य होते. या तिन्ही लोकोत्सवांत गायल्या जाणार्‍या कित्येक गीतांमध्ये पाने, फुले, फळे, झाडे, पक्षी, श्वापदे, जीवचर, नदी, डोंगर, वनदेवता इत्यादींचा उल्लेख सापडतो. यामागेसुद्धा तोच उद्देश आहे.

कौटुंबिक स्तरावर स्त्रीचं संस्कृतीच्या रक्षणाचं कार्य खूप व्यापक आहे. माता ही स्त्रीची प्रथम भूमिका. या भूमिकेमुळेच ती महामाता पृथ्वीशी निगडित आहे. माता या भूमिकेतून स्त्री बाळाला जन्म देते, त्याचे संगोपन करते, त्याचबरोबर त्याच्यावर संस्कार करते. समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून जगण्यासाठी त्याला तयार करते. लहानपणीच ती त्याला सभोवतालची माहिती देते, नात्या-गोत्यांची ओळख करून देते, त्याला भाषा शिकते, कसं खावं, काय खावं, काय पेहराव करावा, कोणते अलंकार घावलावेत… वगैरे जीवनाशी निगडित गोष्टींची त्याला समज घडवते. आईने लहानपणी केलेल्या संस्कारातूनच पुढं त्याचं व्यक्तिमत्त्व घडतं. म्हणूनच ज्या घरातील स्त्री चांगली संस्कारित असते ते घरही संस्कारमय असतं असं म्हटलं जातं. स्त्री आपल्या बाळावर हे संस्कारांचं लेणं अगदी त्याच्या पाळण्यातील अवस्थेतूनच करते. पाळण्यातील बाळाला झोके देत देत निजवताना गाणार्‍या अंगाईगीतातून ती तिच्या संस्कारमय शिकवणीची सुरुवात करते. कोंकणी लोकसंस्कृतीच्या भांडारात अशी कित्येक अंगाईगीतं सापडतात, जी आज आडगावी कुठंतरी चुकून गायलेली दिसतात. आज कालप्रवाहात हरवत गेली तरी संस्कारांची गंगा इथपर्यंत पोहोचवण्यात त्याचं कालचं कार्य अमोल आहे हे विसरता येत नाही.

उदाहरणार्थ ः
जय जय आंब्या
भार जालो जांब्या
आनी रतन खांब्या
बाबा पाळणें बांदू|
घरातील जन्मोत्सव धरून मरणोत्सवापर्यंतचे सारे संस्कार नियंत्रित करण्याचे कार्य एकेकाळी पूर्णपणे स्त्रीच करायची (घरातील किंवा कुटुंबातील वयस्क स्त्री). आदिवासी समाजात या स्त्रीला ‘घन्नी’ असे बिरूद आहे. घरातील दैनंदिन व्यवहारसुद्धा ती नियंत्रित करायची. कालप्रवाहात पुरुषप्रधान संस्कृतीने प्रधान संस्कृतीवर मात केली अन् घन्नीचं महत्त्व उणावलं. तरी कौटुंबिक कार्यात खास करून लग्न, डोहाळे, बारसा इत्यादी संस्कारांत तिला अजूनही महत्त्व आहे. खरं तर हे संस्कार तिचेच असतात. पुरुषाची इथे भूमिका आयोजकाची असते. एकेकाळी या लग्नात पुरोहित नसायचा, वैदिक मंत्र नसायचे, तेव्हा कुटुंबातील किंवा जातीतील प्रमुख स्त्रीच ती भूमिका निभवायची. ओवी गाऊन लग्नविधी संपन्न कारायची. या ओव्याच त्याकाळी मंत्र असायच्या. अशा कित्येक ओव्या आजही प्रचलित आहेत.

वैदिक पद्धतीने ब्राह्मण पुरोहिताच्या मंत्रोच्चारणातून लग्न लावलं तरी या ओव्या परंपरा म्हणून आजही कित्येक लग्न संमारभांत गायल्या जाताना दिसतात. ज्या समाजाच्या मूळ या ओव्या नाहीत त्या ब्राह्मण समाजानेही नंतरच्या काळात त्या आपल्या म्हणून अंगिकारलेल्या आहेत. कसंही का असेना, परंतु या ओव्यांद्वारे संस्कृतीची गुडी पुढच्या पिढीच्या हातात जात आहे आणि हे काम स्त्रीकडूनच होत आहे, हे खरे.

वरील कार्यांबरोबरच आदित्यवार, मंगळागौरी, गौरी-गणपती, महालक्ष्मी, दिवाळी-दसरा, शिगमा अशी उत्सव-व्रते संपन्न करून, त्यांना जुळलेल्या वा इतर प्रथा-परंपरांचे पालन करून, पारंपरिक कथा-गीतांचे गायन करून, स्त्रीनं कित्येक शतकांपासून संस्कृतीची गुडी उभारून धरलेली आहे. त्यामुळे गोव्यातील संस्कृतीचं एक भव्य चित्र समाजापुढे उभं राहतं. या कार्यात या भूमीवर बस्तान करून असलेल्या प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक जाती-जमातींच्या स्त्रीचं चिमूटभर तरी योगदान आहेच, हे मुद्दाम नमूद करावे लागेल.