लोकसंख्या घटणार

0
25

भारताची लोकसंख्या हा आजवर चिंतेचा विषय मानला जात होता. परंतु अलीकडेच लॅन्सेट ह्या जगप्रसिद्ध नियतकालिकामध्ये जागतिक लोकसंख्यावाढीसंदर्भात जो एक अहवाल प्रसिद्ध झाला, त्यातील निष्कर्ष चक्रावून टाकणारे आहेत. भारतासह जगातील अनेक देशांतील प्रजननदर घसरत चालला असून त्याची परिणती म्हणून भविष्यात ह्या देशांतील लोकसंख्येत घट दिसू लागेल असे ह्या अहवालातील अनुमान आहे. हा अहवाल आल्यापासून समाजशास्त्रज्ञांपासून अर्थतज्ज्ञांपर्यंत सर्वांमध्ये विचारमंथन सुरू झाले आहे. लोकसंख्येच्या टाइमबॉम्बवर आपला देश उभा आहे असे आजवर नेहमी म्हटले जाई, परंतु ह्या अहवालातील निष्कर्ष जर खरे मानले, तर भविष्यात उद्भवणाऱ्या अनेक प्रश्नांचा विचार आतापासूनच करावा लागेल यात शंका नाही. लोकसंख्या ही बाब देशाच्या विकासाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाची असते आणि तिचे कमी वा अधिक असणे, किंवा त्यातील काम करण्याच्या वयाच्या लोकसंख्येचे कमीअधिक प्रमाण हे त्या देशाच्या प्रगतीशी थेट निगडित असते. जपानसारख्या देशांमध्ये वृद्धांची संख्या मोठी असल्याने त्यांच्यासाठी ती मोठी समस्या बनलेली आहे. चीनमध्ये मध्यंतरी लोकसंख्या वाढीसंदर्भात कडक निर्बंध घातले गेले होते, परंतु त्याचा परिणाम उलटा होऊ लागल्याचे दिसताच त्यामध्ये शिथिलता आणणे त्या देशाला भाग पडले. भारतामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना देशाची वाढती लोकसंख्या हा विषय गांभीर्याने घेतला गेला आणि छोटे कुटुंब, सुखी कुटुंब हा विचार जनमानसावर बिंबवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले. केवळ हा संदेश समाजात पसरवण्यापुरतेच हे प्रयत्न सीमित उरले नाहीत, तर प्रत्यक्ष जोरजबरदस्तीच्या नसबंदींपर्यंत हा प्रकार चिघळला. आणीबाणीच्या काळात संजय गांधींच्या नेतृत्वाखाली सक्तीच्या नसबंदीचा जो पोरखेळ मांडला गेला, त्यातून लोकसंख्या काही कमी झाली नाही, परंतु जनतेमध्ये धास्ती मात्र निर्माण झाली. एकीकडे शिक्षित, मध्यमवर्गीय जनता आपले कुटुंब मर्यादित ठेवण्याची शिकस्त करीत असताना दुसरीकडे, काही अल्पसंख्यक समुदायांमध्ये मात्र लोकसंख्यावाढीवर कोणताही अंकुश न ठेवला गेल्याने विशिष्ट समुदायाची लोकसंख्या वाढती राहिली आणि त्याचा फटका मात्र सर्वांनाच बसला. पोर्तुगीज काळात गोव्यात सरकारधार्जिणी पिढी निर्माण करण्यासाठी लोकसंख्यावाढीला उत्तेजन दिले जात असे. एकेका दांपत्याला अकरा बारा मुले ही तेव्हा सामान्य गोष्ट असे आणि पोर्तुगीज सरकार त्याला उत्तेजनही देत असे. मात्र, मुक्तीनंतर देशापुढे आ वासून उभ्या राहिलेल्या प्रश्नांचे मूळ लोकसंख्येत आहे हे लक्षात आल्यानंतर कुटुंबनियोजनास अपरिमित महत्त्व प्राप्त झाले. मात्र, आता प्रजनन प्रमाण घटत चालल्याचा जो अहवाल आलेला आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर देशाला आपली प्राधान्ये तपासून पाहावी लागतील असे दिसते. एका ठराविक टप्प्यानंतर बहुतेक देशांतील लोकसंख्येत घट दिसू लागेल असे हा अहवाल दर्शवतो. चीनची सध्याची जी लोकसंख्या आहे, ती सन 2100 पर्यंत अर्ध्यावर येईल असे ह्या अहवालातील अनुमान आहे आणि ते पुढे येऊ घातलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून द्यायला पुरेसे ठरावे. केवळ आफ्रिकेतील देश सोडल्यास जगभरामध्ये लोकसंख्या घटत राहील असा हा अंदाज आहे. म्हणजेच जगात जन्माला येणाऱ्या दर दोन मुलांपैकी एक मूल हे आफ्रिकी देशात जन्माला आलेले असेल, असा ह्या अहवालाचा निष्कर्ष आहे. लोकसंख्या मर्यादित राहणे हे सर्वांपर्यंत समृद्धी पोहोचवण्यासाठी आवश्यक जरी असले आणि गरीबीपासून कुपोषणापर्यंतच्या समस्या ही अजस्र लोकसंख्येची परिणती जरी असली, तरीही लोकसंख्येत सतत घट होत जाणेही देशाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नाही असे तज्ज्ञांना वाटते. आजच्या कमावत्या पिढीला शक्यतो लवकर मूल नको असते हे तर दिसतेच आहे. परंतु एक विशिष्ट वय उलटून गेल्यानंतर तरी मुलाचा विचार त्यांनी करावा असे त्यांच्या पालकांना वाटत असते. मात्र, आजची तरुणाई हा चौकटीतला विचार करणारी नाही. दैनंदिन जीवनशैली, त्यातील ताणतणाव, आदी गोष्टींचाही प्रजननदर घटण्यावर मोठा परिणाम झाला आहे असे सांगितले जाते. कारणे काहीही असोत, परंतु लोकसंख्यावाढ जशी संकटांना घेऊन येणारी ठरते, तशीच तिच्यात एकाएकी होणारी घटदेखील नव्या समस्या आणि संकटे घेऊन येणारी ठरू शकते. कमावत्या वयातील लोकसंख्येचे प्रमाण किती राहील, त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची संख्या किती असेल, स्त्रीपुरूष समतोल किती राहील ह्या सर्व गोष्टी भविष्यात महत्त्वाच्याच ठरतील. रोजगारनिर्मिती, गरीबी निर्मूलन, देशाची समृद्धी ह्या सर्व बाबतींमध्ये लोकसंख्येतील चढउतार महत्त्वाची भूमिका बजावत असतात ह्याची जाणीव ह्या घडामोडींनी निश्चितच करून दिलेली आहे. लोकसंख्यावाढ ही जशी आपल्या देशापुढील समस्या होती व आहे, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये लोकसंख्येतील घट किंवा घसरण आणि स्त्रीपुरूष लोकसंख्येतील व्यस्त प्रमाण, कमावत्या लोकसंख्येचे प्रमाण कमी होणे अशा नव्या समस्या उद्भवणार नाहीत हेही पाहावे लागेल.