>> बहुजन समाजाच्या नेत्यांचे आवाहन
भाजप केवळ निवडणुकीच्या वेळीच बहुजन समाजाविषयी चिंता व्यक्त करतो, सहानुभूती दाखवतो. त्यामुळे त्यांच्या डावपेचांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारांचा पराभव करावा आणि लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप आणि कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना विजयी करावे, असे आवाहन बहुजन समाजाच्या नेत्यांनी काल पत्रकार परिषदेत केले.
काँग्रेस नेते गिरीश चोडणकर, माजी मंत्री चंद्रकांत चोडणकर, माजी आमदार धर्मा चोडणकर, आपचे अध्यक्ष अमित पालेकर यांच्यासह बहुजन समाजाच्या नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अमरनाथ पणजीकर, सुनील कवठणकर, उदय च्यारी, नीलेश च्यारी, अविनाश भोसले, शरद चोपडेकर, प्रदीप नाईक, वीरेंद्र शिरोडकर उपस्थित होते.
भाजप-आरएसएसची विचारधारा बहुजन समाजाच्या विरोधात आहे. आरएसएसला आरक्षण संपवायचे आहे. मात्र निवडणुकीच्या वेळी मत मिळविण्यासाठी ते बहुजन समाजाबद्दल खोटी सहानुभूती दाखवतात. लोकांनी त्यांचे राजकारण समजून घेतले पाहिजे, असे चोडणकर म्हणाले.