लोकशाहीचा गजर

0
100

जम्मू काश्मीर आणि झारखंड विधानसभेच्या काही जागांसाठी पहिल्या टप्प्यात नुकतेच जोरदार मतदान झाले. काश्मीर खोर्‍यात फुटिरतावाद्यांनी आणि झारखंडमध्ये माओवाद्यांनी दिलेल्या बहिष्काराच्या हाकेला न जुमानता मतदारांनी ज्या उत्साहाने आणि हिंमतीने मतदानामध्ये भाग घेतला ते पाहिले, तर त्या हिंमतीला दाद द्यायलाच हवी. आपल्या जिवाची तमा न बाळगता मतदार मतदानासाठी धैर्याने घराबाहेर पडले आणि त्यांनी आपापल्या पसंतीच्या उमेदवाराच्या बाजूने मतदान केले. मतदान कोणाला होते यापेक्षाही वरीलपैकी हिंसाचारग्रस्त मतदारसंघांमध्ये निर्भीडपणे मतदान होणे हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे. आपल्या प्रश्नांची तड लागण्यासाठी लोकशाही मार्गानेच जायला हवे याचे भान मतदारांना आहे याची हे भरघोस मतदान साक्ष देते. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पंधरा मतदारसंघांमध्ये तब्बल ७१.२८ टक्के मतदान झाले, तर झारखंड विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यात ६१.९२ टक्के मतदान झाले आहे. म्हणजे काश्मीरमध्ये झारखंडपेक्षाही अधिक मतदान झाले ही बाब फुटिरतावाद्यांना जबर धक्का देणारी ठरेल यात शंका नाही. सुरक्षा दलांमुळे मतदान वाढले असा कांगावा आता सईद अली गिलानींसारखे फुटीर नेते करीत असले, तरी जनतेने त्यांना जुमानलेले नाही आणि भारतीय लोकशाही व्यवस्थेमध्ये विश्वास व्यक्त केलेला आहे हे सत्य त्यांनी आता तरी स्वीकारायला हवे. हुर्रीयत कॉन्फरन्सच्या जवळजवळ सर्व गटांनी यंदाच्या मतदानावर बहिष्कार घालण्याची हाक दिली होती. जेकेएलएफनेही मतदारांना धमकावले होते. परंतु या कशा कशाचाही परिणाम मतदानावर झाला नाही. ज्या पंधरा मतदारसंघांमध्ये हे उत्साही मतदान झाले, त्यापैकी पाच तर खुद्द काश्मीर खोर्‍यातले आहेत. सहा जम्मूमधले असले तरी त्यातील काही भाग हा दहशतवादाच्या छायेतलाच होता. लडाखमधील चार मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झाले. खुद्द काश्मीर खोर्‍यातील मतदारसंघांमध्ये झालेले जोरदार मतदान पाहून फुटीरतावाद्यांच्या पायांखालची जमीनच सरकेल यात शंका नाही. काश्मीर खोर्‍यामध्ये मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांच्या गंदेरबलमध्ये २००८ च्या निवडणुकीपेक्षा तब्बल तेरा टक्क्यांनी अधिक मतदान यावेळी झाले. त्याच्या उत्तरेला असलेल्या बंदिपुरामध्ये ११ टक्क्यांनी मतदान वाढले. फुटिरतावाद्यांनी जंग जंग पछाडूनही त्यांना न जुमानता मतदारांनी रांगा लावून मतदान केले याचा अर्थ त्यांनी आता तरी समजून घ्यायला हवा. काश्मीरच्या लोकांना विकास हवा आहे. रोजगार हवा आहे. दहशतवादाने आणि हिंसाचाराने आपले फार मोठे नुकसान केले याची जाणीव त्यांना आहे. आपल्या विकासाचा राजमार्ग लोकशाहीने आपल्याला दिलेल्या मताधिकारामधूनच जातो हे जनतेला कळू लागले आहे. फुटिरतावाद्यांकडून पुरता भ्रमनिरास झालेला आहे. श्रीनगरमध्ये अलीकडेच येऊन गेलेल्या पुरावेळी भारतीय लष्करच जनतेचे प्राण वाचवायला धावून आले. पंतप्रधानांनी कोट्यवधींची मदत दिली. फुटीर नेते आणि त्यांचे चेले मात्र मदत करण्याऐवजी मदतकार्यात अडथळे आणत होते, एनडीआरएफच्या बोटी पळवत होते, दगडफेक करीत होते हे वास्तव तेथील सर्वसामान्य जनतेने पाहिले आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यास उमर अब्दुल्ला पुरते नाकाम ठरले यालाही जनता साक्षी आहे. त्यांच्या राजवटीत काश्मीरचा काहीही विकास झाला नाही याची चीड मतदारांमध्ये आहे आणि तीही यावेळी मतपेटीतून व्यक्त होईल असे संकेत आहेत. यावेळी प्रथमच भारतीय जनता पक्षाने काश्मीर सर करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत. मोदी लाट कुठवर थडकते ते ही निवडणूक सांगणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरच्या ८७ पैकी २५ विधानसभा क्षेत्रांमध्ये भाजपाला सर्वाधिक मते मिळाली होती, तर नऊ क्षेत्रांमध्ये भाजप दुसर्‍या स्थानी पोहोचला होता. एकूण मतांची टक्केवारी ३२.४ टक्के होती. उमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांची घराणेशाही मोडीत काढा अशी हाक मोदींनी तेथील जनतेला दिलेली आहे. मतदानासाठी उत्साहाने बाहेर पडलेले तेथील मतदार आपला कौल काय देतात त्याबाबत अर्थातच उत्सुकता आहे. पण मतदान कोणाच्याही पारड्यात होवो, शेवटी विजय लोकशाहीचाच असणार आहे. काश्मीरमध्ये झालेले भरघोस मतदान हा लोकशाहीचा गजर आहे आणि तो आश्वासक आहे!