लोकवस्तीतील भंगारअड्डे अन्यत्र हलवणार

0
10

>> यापुढे सर्व भंगारअड्ड्यांची नोंदणी बंधनकारक; मुख्यमंत्र्यांची माहिती

राज्यात भंगारअड्ड्यांच्या नोंदणीची प्रक्रिया येत्या 15 दिवसांत सुरू केली जाणार आहे. राज्यातील सर्व भंगारअड्ड्यांची सहा महिन्यांत नोंदणी करणे बंधनकारक असेल. तसेच हे भंगारअड्डे लोकवस्तीतून बाहेर अन्यत्र हलवले जातील, त्यासाठी एका वर्षाहून अधिक कालावधी लागू शकतो, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या खासगी ठरावाला उत्तर देताना ते बोलत होते.
राज्यातील भंगारअड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. भंगारअड्ड्यांना मार्गदर्शक सूचना लागू करून त्यांचे नियमन करण्याची गरज आहे, असा खासगी ठराव आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मांडला होता. या ठरावावरील चर्चेत आमदारांनी भंगारअड्ड्यांमुळे होणाऱ्या समस्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या.

राज्यात भंगारअड्डे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. या भंगारअड्ड्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास, आरोग्य, सुरक्षा आदी समस्या निर्माण होत आहेत. भंगारअड्डे लोकवस्तीतून बाहेर काढण्याची गरज आहे, असेही शेट्ये यांनी सांगितले.
भंगारअड्ड्यामुळे समस्या निर्माण होत आहे; मात्र सरकारी पातळीवरून भंगारअड्ड्यांच्या प्रश्नावर तोडगा काढला जात नाही. भंगारअड्ड्यांची गंभीर बनलेली समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. या विषयावरील चर्चेत आमदार डिलायला लोबो, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, विरेश बोरकर व इतरांनी सहभाग घेतला.