लॉकडाऊन : पृथ्वीच्या पुनरुद्धाराची एक संधी

0
145
  • प्रा. डॉ. मनोज बोरकर (कार्मेल महिला महाविद्यालय, नुवे)

 

मानवी जीवन जर का सुखी, समाधानी व्हायला हवे, तर आपल्या प्राबल्याच्या तसेच बुद्धिमत्तेच्या जोरावर पृथ्वीचे शोषण नाकारून, कृतज्ञतेच्या दृष्टिकोनातून ही पृथ्वी आणि इथल्या नैसर्गिक भांडवलाचा शाश्वत वापर करणे अपरिहार्य ठरेल. नाहीतरी कोरोनासारख्या एका अतिसूक्ष्म विषाणूने सम्पूर्ण मानवजातीचे गर्वहरण केलेच आहे!

 

 

गेले पाच महिने, कोविड-१९ ह्या संसर्गजन्य रोगाच्या महामारीने पूर्ण जगाला हवालदिल आणि हतबल करून सोडले आहे. एकामागोमाग एक देश ह्या संक्रमण लाटेच्या तडाख्यात सापडले आहेत आणि जागतिक अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

चीन देशातील वटवाघळांत सापडणार्‍या ह्या विषाणूंचा ङ्गैलाव सुरुवातीला तेथील वूहान शहरातील नागरी परिसरात झाला. चिनी नागरिकांच्या विचित्र खाद्य-संस्कृतीमुळे हा नवीन कोरोना विषाणू तेथील वातावरणात आक्रमकरीत्या पसरला. चीनमधील श्वसनरोग चिकित्सकाना ह्या संकटाची चाहूल लागताच त्यांनी हा प्रकार तेथील शासकीय अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिला, जेणेकरून रोग नियंत्रित करणे शक्य होते. पण तेथील सरकारच्या शासकीय गुप्ततेच्या धोरणांमुळे असेल किंवा आंतरराष्ट्रीय संताप व परिणामाच्या भीतीमुळे असावे, चीन सरकारने वेळीच त्यांच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील आणीबाणी  जागतिक आरोग्य संघटनेच्या निदर्शनास आणून दिली नाही.

आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटनामुळे वूहानमधील हा विषाणू चीनच्या भौगोलिक सीमेबाहेर पडला आणि बघता बघता आज जगभरातील २१० देशात ह्या भयंकर संसर्गजन्य रोगाचा शिरकाव झाला आहे.

नवीन विषाणू असल्याकारणाने अजूनतरी औषध किंवा लस उपलब्ध नाही. मरणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हे जिवाणू लाळ तसेच शिंकेतून पसरत असल्यामुळे तोंडाला मास्क लावून ङ्गिरणे अपरिहार्य आहे. शक्यतो गर्दीत न जाता घरातच राहण्याचा सल्ला दिला गेला आहे, जेणेकरून आपला संपर्क कमीतकमी लोकांशी येईल व संसर्ग टाळता येणे शक्य होईल.

यातायातीवरदेखील निर्बंध घातले गेले आहेत, तसेच बर्‍याच राज्यांनी सीमाबंदी केली आहे. तात्पर्य पोलीस पहाराही कडक असल्याने ह्या लॉकडाऊन किंवा ताळाबंदीमुळे नागरिकांची बरीच गैरसोय झालेली दिसते आहे. नोकरी-धंद्यावर झालेला वाईट परिणाम, जीवनावश्यक वस्तूंचा अनियमित पुरवठा, नातेवाईक व मित्र मंडळींशी तुटलेला संपर्क व भविष्याबद्दल अनिश्चितता ह्यांचा एकत्रित परिणाम म्हणजे सध्या सर्वत्र पसरलेलं नैराश्य. लॉकडाऊन कधी संपेल आणि सामाजिक स्थिती सामान्य कधी होईल ह्या एकाच गोष्टीची सर्वत्र चर्चा होत आहे.

पण अशा ह्या प्रतिकूल परिस्थितीत ह्या पृथ्वीतलावर एक अतिशय स्पृहणीय घटना घडतेय आणि ती म्हणजे आपल्या सभोवतालचं प्रदूषित वातावरण निवळायला लागले आहे. अमेरिका तसेच युरोपमधील कित्येक प्रगत राष्ट्रातील आक्रमक औद्योगिकीकरणामुळे होणारी पर्यावरणाची क्षती लॉकडाऊनच्या काळात बर्‍यापैकी कमी झाली आहे. मानव प्रजातीचा पृथ्वीवरील संचार तसेच वर्चस्व, मोटार वाहनांतून तसेच कारखान्यातून निघणारा विषारी धूर आणि धूराडा व गावा-शहरातील गोंगाट कमी झाल्यामुळे हवा, पाणी व इतर नैसर्गिक घटकांची गुणवत्ता बर्‍यापैकी सुधारली आहे.

उपग्रह-प्रतिमांचे बारकाईने निरीक्षण केल्यास प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे शुद्ध स्वच्छ आकाश, एरवी भकाभका धूर ओकणार्‍या कारखान्यांची आत्ता शांत झालेली धुराडी, कधी काळी ग्राहकांच्या गर्दीने उतू जाणारे पण आता निर्जन झालेले बाजार व रस्ते, तसेच नदी व समुद्राचे वाहणारे निळे पारदर्शक पाणी. सृष्टीच्या घटकांचे पुनरुज्जीवन होऊन मानवनिर्मित सर्व साधन-सुविधांना जणू निवृत्तीचे वेधच लागले आहेत की काय, असा भास होतोय!

एकीकडे लॉकडाऊन असल्यामुळे नागरिक नाइलाजाने आपापल्या घरी बसले आहेत तर ह्या पृथ्वीवरील कमी लेखले जाणारे इतर भूचर, जलचर तसेच आकाशी स्वच्छंद भरारी घेणारे पक्षी निर्धास्तपणे ह्या असामान्य परिस्थितीचा पुरेपूर आस्वाद घेताना दिसत आहेत.

आपल्या देशातील कित्येक राज्यांत गेले काही दिवस वन्य प्राणी मुक्त भ्रमण करताना दिसत आहेत. उदाहरणार्थ नोएडा येथे भर रस्त्यांवर नीलगाईंचा कळप, तिरुपति येथे चितळ, केरळातील कोझिकोड येथे तर रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंगवर रानटी लहान जवादी मांजर दिसले. मुंबई येथील पारसी कॉलोनीत अनेक मोर बागडतानाचे दृश्य विलोभनीय होते. आसामातील सोनापुर येथे भर वस्तीत एक-शिंगी गेंड्याची मुक्त भटकंती बघायला मिळाली. ह्या अनपेक्षित मुक्त विहाराचा लाभ जलचरांनीही पुरेपूर उठवला. मुंबईत मरीन ड्राइव्हच्या पाण्यात दुर्मीळ असे डॉल्ङ्गिंस बघायला मिळाले तर ओडिशा राज्यातील ऋषिकुल्या किनार्‍यावर दिवसाढवळ्या समुद्री कासव अंडी घालताना पाहून तेथील वनाधिकारी आश्चर्यचकित झाले!

भारताव्यतिरिक्त इतर अनेक देशात शहरी वसाहतींच्या निर्जन रस्त्यांवर दुर्मीळ अशा जनावरांच्या प्रजाती आणि वन्य प्राण्यांचा मुक्त संचार होताना दिसतो आहे. जपानमध्ये भर रस्त्यात (अर्थातच वाहनांची रेलचेल नसलेल्या) डोंगरी-बोकड, वेल्स येथील शहरी भागांत समुद्री-सिंह, तेल-अवीव इस्राईल येथील निर्जन भागांत कोल्हे, अहमदाबाद इथे राष्ट्रीय मार्गांवर काळतोंड्या माकड, ङ्ग्रांसच्या कित्येक शहरात रानडुक्कर इत्यादी हिंस्त्र श्वापदांचा मुक्त भयविरहित वावर दिसून येत आहे.

ह्या पृथ्वीवर वावरणारे सर्व जीव-जन्तू उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून अवतरले आहेत. तरी ह्या ग्रहावरील प्रत्येक प्रजाती इथे जगण्यासाठी व टिकण्यासाठी असंख्य अडचणीतून मार्ग काढत धडपडत असते. मानव आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर (आणि गैरवापर) करून ह्या ग्रहावरील प्रबळ प्रजाती होऊन बसली आहे. एरवी आपल्या व्यस्त आणि स्वकेंद्रित जीवनात आपल्याला ह्या इतर जीवसृष्टीचा विसर पडतो किंबहुना आपण त्यांना गृहीत धरतो. पृथ्वीवरील प्रत्येक जीवित घटक आपल्या पारिस्थितीचा अविभाज्य भाग असून त्याची योग्य ती काळजी आणि जबाबदारी आपण सर्वांनी घेतली पाहिजे, नपेक्षा जीव-साखळीचे महत्त्वाचे दुवे तुटतील व त्यात सर्वात जास्त नुकसान आपले होईल.

लॉकडाऊनच्या काळात पर्यावरणाचे उल्लेखनीय परिवर्तन झालेले आपण पाहतोच आहे. पुढील काळात हे अनुभव विसरून ‘ये रे माझ्या मागल्या’ होण्याची संभावना नक्कीच आहे. तरी शिस्तबद्ध जीवनपद्धतीचा मार्ग स्वीकारून पर्यावरणाची हानी न होऊ देणे ह्यातच व्यवहारिकपणा आणि शहाणपणा आहे. मानवी जीवन जर का सुखी समाधानी व्हायला हवे, तर आपल्या प्राबल्याच्या तसेच बुद्धिमत्तेच्या जोरावर पृथ्वीचे शोषण नाकारून, कृतज्ञतेच्या दृष्टिकोनातून ही पृथ्वी आणि इथल्या नैसर्गिक भांडवलाचा शाश्वत वापर करणे अपरिहार्य ठरेल. नाहीतरी कोरोनासारख्या एका अतिसूक्ष्म विषाणूने सम्पूर्ण मानवजातीचे गर्वहरण केलेच आहे!