- डॉ. संगीता गोडबोले
येणारा काळ कसा असेल याचा अंदाज आत्ताच करता आला नाही तरीही त्या जगाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणार्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवून उद्याची पहाट पहायची असेल तर आत्ता.. लॉकडाऊनचा एकमेव पर्याय आहे यात शंका नाही.
लॉकडाऊन ..
बंदिस्त ..
आपल्याच घरात .. आता असं म्हणू की .. आपल्या परिघात, जो सद्य परिस्थितीत वाढवणं कठीण आहे आणि तसा प्रयत्न केल्यास त्याचे दूरगामी परिणाम हे अनिष्टच असणार आहेत याची स्वतःला जाणीव झाल्यामुळे ..
किंवा ..
ती कुणा भविष्यकाळात असू शकणार्या भवितव्याची जाणीव असणार्या जाणकारामुळे.
तर ..
आपल्या घरात आपणच आपल्याला बंदिस्त करून घेत आहोत ..
कदाचित आलेल्या संकटाच्या पावलांचा वेग मंदावण्यासाठी ते उपयुक्त ठरेल.
आपल्या आधी याच चक्रातून गेलेल्या इतर देशातील लोकांच्या अनुभवावरून तरी आपण शहाणे होणार आहोत का?
‘पुढच्यास ठेच मागच्यास शहाणा’.. ही म्हण फक्त कागदावर किंवा शाळेच्या परीक्षेत वाक्यात उपयोगी पडण्याकरता नसून त्याचा विचारपूर्वक अवलंब करणं हाच शहाणपणाचा भाग असेल.
चीन, इटली, स्पेन यासारख्या देशातील लोक ज्या मानसिक, आर्थिक परिस्थिती आणि शारीरिक व्याधीतून गेले ती ..किंवा तशीच वेळ आपल्यावरही येईल कां.. हा विचार अस्वस्थ करतो खरा .. पण त्याआधी ..होणार्या आर्थिक ओढाताणीवर कशी मात करावी .. हा प्रश्न अधिक सतावतोय.
आपण एकाच वेळी आपल्याला मृत्यूच्या दारी पोहोचू नये म्हणून स्वतःचे जीव धोक्यात घालून काम करणार्या लोकांबद्दल ऋणनिर्देशासाठी एकाच वेळी एकशे तीस कोटी लोकांच्या देशानं टाळ्या आणि थाळ्यांचा ध्वनी ..आसमंत भरून राहीपर्यंत केला.
एकाच वेळी दिवे पणत्या ज्योती उजळल्या ..
आपण एकटे आहोत ही अत्यंत भयावह जाणीव कमी करण्याचा आणि मनोबल वाढवण्याचा तो एक साधा सोपा आणि निरुपद्रवी उपाय होता. शेवटी हा सगळा संकटकाळ सरेल तेव्हा याची जाणीव अधिक प्रखरपणे होईल.
तेव्हा असणारे वातावरण, लोकांची मानसिक स्थिती कशी असेल याचा अंदाज करणं कठीण आहे.
पण ती आधीसारखी असणं शक्य असेलसं वाटत नाही.
कारण अस्थिरता .. मग ती मानसिक असो वा आर्थिक ..त्याच्या मुळाशी असणार आहे.
आम्हांला काय होणार आहे?.. अशी बेफिकिरी दाखवणार्यांचा एक गट आणि येणार्या संकटाची जाणीव होऊन त्यातून सुटकेचा मार्ग शोधणार्यांचा दुसरा गट आणि या दोहोंमधला .. गोंधळलेला असा तिसरा गट ..
परिणाम सर्वांनाच भोगावे लागणार आहेत फक्त त्याचं प्रमाण भिन्न असेल.
या सर्वांमध्ये माणुसकीला जागणारे जसे अनेक आहेत तसेच आपल्यामुळे प्रश्न निर्माण करणारे आणि तो जाणीवपूर्वक वाढवणारे लोकही आहेत. त्यांच्या बंदोबस्ताची मात्र नितांत गरज आहे.
सतत घरात राहून एका वेगळ्या स्तरावर नात्यांची जाणीव होतेय ..
यामुळे लोक कदाचित एकमेकांच्या अधिक जवळ येतील कदाचित दुरावतील.
घरी राहून काम करणार्या लोकांची कमीत कमी आवक तरी सुरू आहे. पण हातावर पोट असणार्या लोकांचे आर्थिक प्रश्न अधिक गंभीर आहेत.
नवीन उपाय सापडेपर्यंत ..औषधांचे शोध लागून परिणामांचा अंदाज येईपर्यंत आणि नवीन लस तयार होईपर्यंत किती काळ जावा लागेल हेही माहीत नाही.
येणारा काळ कसा असेल याचा अंदाज आत्ताच करता आला नाही तरीही त्या जगाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणार्या अदृश्य शक्तीवर विश्वास ठेवून उद्याची पहाट पहायची असेल तर आत्ता .. लॉकडाऊनचा एकमेव पर्याय आहे यात शंका नाही.