लेखापरीक्षणासाठी यंदापासून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

0
9

>> महालेखापालांची माहिती; साई-20 परिषदेचा समारोप

देशात लेखापरीक्षणासाठी यावर्षीपासून डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. जी-20 गटातील अनेक देशांत लेखा परीक्षणासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारत देशात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रथमच वापर केला जाणार आहे, अशी माहिती भारताचे महालेखापाल (कॅग) गिरीश चंद्र मुर्मू यांनी जी-20 अध्यक्षतेखालील साई-20 परिषदेच्या समारोपानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना काल दिली.
महालेखापाल ही लेखापरीक्षण करणारी स्वायंत्त संस्था आहे. त्यामुळे जी-20 मध्ये साई गटाला संस्था गटाचा दर्जा देण्याची शिफारस जी-20 देशाच्या प्रमुखांकडे केली जाणार आहे. स्वायत्त संस्थेला कुठल्याही तरी एका संस्था गटामध्ये समावेश करणे अयोग्य आहे, असेही मुर्मू यांनी सांगितले.

साई-20 च्या दोन दिवसाच्या बैठकीत लेखापरीक्षणातील सुधारणांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. लेखापरीक्षणातील नवीन तंत्रज्ञानाच्या माहितीचे आदानप्रदान करण्यात आले. या बैठकीत नव्याने तयार करण्यात आलेला मसुदा सादर करण्यात आला. लेखापरीक्षणातील डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे लेखा परीक्षणाचा दर्जा आणखीन उंचावण्यास मदत होणार आहे. नील अर्थव्यवस्था आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) हे विषय मोठे आव्हानात्मक आहेत, असेही मुर्मू यांनी सांगितले.

महालेखापाल ही सर्वोच्च स्वायत्त संस्था आहे. या संस्थेची स्वायत्तता कायम राखण्यासाठी महालेखापाल गटाला कुठल्या एका गटामध्ये समावेश करणे योग्य होणार नाही. जी-20 मध्ये महालेखापाल या स्वायत्त संस्थेला वेगळ्या गटाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव बैठकीत मांडण्यात आला आहे. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व देशाच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. एक-दोन देश या बैठकीमध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. त्यांना प्रस्तावाची प्रत पाठविली जाणार आहे. असे गिरीश मुर्मू यांनी सांगितले.

लेखापरीक्षणामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लक्ष दिले जाणार आहे. भरती नियमामध्ये काही सुधारणा कराव्या लागतील. प्रशासनामध्ये अभियंता, डॉक्टरेट मिळविलेले युवक सहभागी होत असल्याने नवीन एआय तंत्रज्ञानाचा वापर करताना जास्त अडचणी येणार नाहीत, असा विश्वासही मुर्मू यांनी व्यक्त केला.