येथील खास न्यायालय तथा प्रधान जिल्हा व सत्र न्यायालयाने कथित लुईस बर्जर लाच प्रकरणात लुईस बर्जर कंपनीचे माजी अधिकारी जेम्स मॅक्लम यांच्याविरोधात वृत्तपत्रातून नोटीस जारी केली आहे.
न्यायालयाचे समन्स जेम्स मॅक्लम चुकवत असल्याचे निदर्शनास आल्याने ही नोटीस जारी करण्यात आली आहे. जेम्स याला १७ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. राज्यातील जायका प्रकल्पाचे काम मिळविण्यासाठी अधिकारी व राजकारण्यांना लाच दिल्याचे लुईस बर्जर कंपनीने अमेरिकेतील न्यायालयात मान्य केले आहे.
२०१५ मध्ये हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. सरकारच्यावतीने या प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी माजी बांधकाम मंत्री चर्चील आलेमाव, जायकाचे प्रकल्प अधिकारी आनंद वाचासुंदर, सत्यकाम मोहांती, रायचंद सोनी यांना अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना या प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी येथील खास न्यायालयात आठ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.