ज्येष्ठ कॉंग्रेस नेते लुईझिन फालेरो यांची प्रदेश कॉंग्रेस समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने आता प्रदेश कॉंग्रेस समितीला नवचैतन्य प्राप्त होईल असा विश्वास काल कॉंग्रेस प्रवक्ते सुनील कवठणकर यानी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पक्ष श्रेष्ठींनी फालेरो यांच्यावर गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवल्याने त्यानी अखिल भारतीय कॉंग्रेस समितीचे सरचिटणीसपद सोडून एकाप्रकारे त्यागच केला आहे, असे कवठणकर म्हणाले. फालेरो यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीस या नात्याने आठ राज्यांची जबाबदारी होती. पैकी कर्नाटकसह पाच राज्यात कॉंग्रेसला विजय प्राप्त झाल्याचे कवठणकर यांनी यावेळी नजरेत आणून दिले. मावळते अध्यक्ष जान फर्नांडिस यांनी त्याची पदावरून उचलबांगडी झाल्यानंतर पक्ष नेतृत्वाच्या विरोधात जी विधाने केली ती अत्यंत आक्षेपार्ह अशी असल्याचे कवठणकर म्हणाले.