खाण लिजांचे नूतनीकरण न करता सरकारने राज्यातील खाणींचा लिलाव करावा, अशी मागणी काल कॉंग्रेस पक्षाने केली.
पक्षाचे प्रवक्ते दुर्गादास कामत हे काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात पक्ष सत्तेवर आल्यास राज्यातील खाणींचा लिलाव करण्यात येईल, म्हटले होते. नरेंद्र मोदी यानीही खाणींचा लिलाव केला जावा अशी भूमिका लोकसभा निवडणुकीपूर्वी घेतली होती, असे कामत म्हणाले.
पर्रीकर सरकारने अगोदर खाण धोरण तयार करावे आणि नंतर खाणींचा लिलाव करावा, अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेतून केली. राज्यातील खाणींचा लिलाव करणेच शहाणपणाचे ठरेल. कारण खाणींचा लिलाव केल्यास सरकारला खूपच जास्त महसूल प्राप्त होऊ शकेल, असा दावा कामत यांनी यावेळी केला.
राज्यात ३५ हजार कोटींचा खाण घोटाळा झाला असल्याचा दावा पर्रीकर हे विरोधी पक्षनेते असताना करीत होते, असे सांगून हा घोटाळा केलेल्या लोकांना पुन्हा खाणी द्यायचा त्यांचा विचार आहे काय, असा प्रश्न कामत यांनी यावेळी उपस्थित केला. खाणी सुरू करण्यापूर्वी सरकारने खाण धोरण तयार करावे. तसेच खाण घोटाळ्याद्वारे जी लूट करण्यात आली ती वसूल केली जावी. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात खाणी सुरू होतील असे पर्रीकर यांनी सांगितलेले असले तरी खाणी खरोखरच सुरू होऊ शकतील की काय याबाबत प्रश्नचिन्ह असल्याचे ते म्हणाले. खाणीसाठीचे पर्यावरण दाखले मिळणे वाटते तेवढे सोपे नसल्याचे त्यांचे म्हणणे होते.