>> इटलीतील स्पर्धेत मिळविला तिसरा नॉर्म
गोव्याचा १४ वर्षीय लिऑन मेंडोसा हा भारताचा ६७वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. लिऑन याने काल गुरुवारी ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेला तिसरा व शेवटचा नॉर्म इटली येथील स्पर्धेत मिळविला. अनुराग म्हामल याच्यानंतर ग्रँडमास्टर होणारा लिऑन हा गोव्याचा दुसरा ग्रँडमास्टर ठरला. लिऑनने १४ वर्षे ९ महिने व १७ दिवसांचा असताना ग्रँडमास्टरपद मिळविले. ऑक्टोबरमध्ये झालेल्या रिगो बुद्धिबळ जीएम राऊंड रॉबिन स्पर्धेत लिऑनने पहिला नॉर्म मिळविला होता.
लिऑनने दुसरा नॉर्म नोव्हेंबरमधील बुडापेस्ट येथील स्पर्धेत प्राप्त केला होता. तर तिसरा नॉर्म त्याने इटलीतील वर्गानी कप स्पर्धेत मिळविला. बासान्नो डेल ग्राप्पा येथील वर्गानी कप स्पर्धेत लिऑन ६.५ गुणांसह दुसर्या स्थानी राहिला. युक्रेनचा विताली बर्नाडस्की ७ गुण घेत प्रथम आला. लिऑन व त्याचे वडील लिंडन हे मार्च महिन्यापासून युरोपमध्ये अडकले आहे. कोरोनामुळे प्रवासावरील निर्बंधांमुळे त्यांना गोव्यात परतणे शक्य झाले नाही. याच बिकट परिस्थितीतही या दुकलीने संधीचे सोने केले. ग्रँडमास्टर किताब मिळविण्यासाठी लिंडन यांनी लिऑनला अनेक स्पर्धांमध्ये खेळण्यास प्रोत्साहन दिले. मार्च ते डिसेंबर या कालावधील लिऑनने १६ स्पर्धा खेळताना आपले इलो रेटिंग २४५२ वरून २५४४ केली. आनंदाच्या तसेच बिकट काळात साथ दिलेल्या सर्वांचे लिऑन याने आभार मानले. ‘ग्रँडमास्टर झाल्यामुळे आनंद गगनात मावेनासा झाला आहे. खूप मेहनतीने हे यश प्राप्त झाले आहे. प्रशिक्षक विशू प्रसन्ना, पालक तसेच खंबीरपणे मागे राहिलेल्या पुरस्कर्त्यांचे त्याने जाहीर आभार मानत आपल्या भावना व्यक्त केल्या.
लिऑन याने मागील वर्षी चेन्नई येथे मायक्रोसेन्स यांनी आयोजित बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला होता. माजी विश्वविजेते व्लादिमीर क्रामनिक व बोरिस गेलफंड यांनी या शिबिरात भारतीयांना मार्गदर्शन केले होते. लिऑनने दुसरा जीएम नॉर्म मिळविल्यानंतर लिंडन यांनी युरोपमध्ये राहताना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. परंतु, त्यांनी जिद्दीच्या बळावर करून दाखवले. जुलै महिन्यात चेन्नईचा जी.आकाश हा भारताचा ६६वा जीएम बनला होता. यानंतर गोव्याच्या लिऑनचा क्रमांक लागतो.