लिंगायत समाजाच्या आंदोलनाला कर्नाटकात हिंसक वळण

0
5

>> पोलिसांचा लाठीमार, अनेकजण जखमी

लिंगायत पंचमसाली समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला कर्नाटकात हिंसक वळण लागले आहे. मंगळवारी बंगळुरूमध्ये विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सुरक्षा तोडून विधानसभेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांचा पाठलाग केला. या लाठीमारामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. या आंदोलनाचे नेतृत्व करणारे भाजपचे अनेक आमदार आणि बसवजय मृत्युंजय स्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनेक आंदोलकांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत.

राज्यातील काँग्रेस सरकार आणि विरोधी पक्ष भाजप आणि जेडीएसमध्ये यावरून वाद सुरू झाला आहे. विरोधी पक्षांनी काँग्रेसवर संतांचा अपमान केल्याचा आरोप केला, त्यावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही. मी प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते, पण ते आले नाहीत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि तो मिळालाच पाहिजे पण आंदोलन शांततेत पूर्ण व्हावे अशी आपली इच्छा असल्याचे सांगितले.

आरक्षण वाढवण्याची मागणी
पंचमसाली लिंगायत समाजाला सध्या शैक्षणिक संस्था आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 5% आरक्षण आहे. आता ते 15% पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी समाजाच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांना मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची वाट पाहण्यास सांगितले आणि अहवालाच्या आधारे योग्य तो निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर अनेक आंदोलकांना दुखापत झाली तर काहींच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला.