लाल वादळ शमणार

0
13

तब्बल 19 वर्षे आंतरराष्ट्रीय टेनिस सर्किटवर घोंगावल्यानंतर राफेल नदाल नावाचे वादळ लवकरच शमणार आहे. नोव्हेंबरमध्ये डेव्हिस चषक स्पर्धेनंतर नदाल नावाच्या जयघोषाला टेनिसप्रेमी मुकणार आहेत. मागील दोन वर्षे दुखापतींनी ग्रासल्यामुळे स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने टेनिसला अलविदा करण्याचा कठीण निर्णय जाहीर केला. संघर्ष हा माझा स्थायिभाव असल्याचे वक्तव्य नदालने दोन वर्षांंपूर्वी फ्रेंच ओपनमधील आपले 14वे व शेवटचे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावल्यानंतर केले होते. खेळाचा आनंद लुटणे शक्य होईपर्यंत खेळत राहणार असल्याचे नदाल म्हणाला होता. यावेळी डाव्या पायाची दुखापत बळावल्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. जवळपास वर्षभरानंतर या चर्चांना अर्धविराम मिळाला होता. परंतु, त्याच्या खालावलेल्या खेळामुळे पुन्हा एकदा या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखे नसले तरी खंत मात्र नक्कीच आहे. ग्रासकोर्टचा बादशाह रॉजर फेडररचा मैदानावरील कट्टर प्रतिस्पर्धी व मैदानाबाहेरील दोस्तीमुळे टेनिसप्रेमींमध्ये या दोघांमधील लढत जणू पर्वणीच असायची. जिंकणे, हरणे या पलीकडे जाऊन या दोघांमधील मैत्री होती.
2004च्या मियामी मास्टर्स स्पर्धेत हे दोघे सर्वप्रथम आमनेसामने आले. 17 वर्षाचा नदाल प्रथमच फेडररला भिडला. यावेळी फेडरर जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी होता. हा सामना नदालने जिंकत टेनिसविश्वाला आपली दखल घ्यायला भाग पाडले. फेडररच्या भव्यदिव्यतेमुळे नदालची कामगिरी काहीशी झाकोळली गेली असली तरी नदालने आपल्या कारकिर्दीची सांगता फेडररपेक्षा दोन ग्रँडस्लॅम विजेतेपदे अधिक मिळवून केली. फेडररच्या निवृत्तीनंतर अख्खे जग त्याच्या कामगिरीची कौतुक करून सोशल मीडियावर व्यस्त असताना नदाल मात्र मैदानावर फेडररचा हात हातात घेऊन ढसाढसा रडला होता. नदालची ही हळवी बाजू अनेकांनी प्रथमच पाहिली होती. अप्रतिम पदलालित्य, मजबूत शरीरयष्टी, प्रतिस्पर्ध्याची कमकुवत बाजू हेरण्याची लाभलेली दैवी देणगी डावखुऱ्या नदालला त्याच्या समकालीन खेळाडूंमध्ये ‘उजवा’ ठरविणारी होती. पाच सेटच्या सामन्यांमध्ये पहिले दोन सेट जिंकून देखील नदालचे प्रतिस्पर्धी पराभवाची धास्ती बाळगून असायचे. उर्वरित तिन्ही सेट जिंकून अवाक करण्याची त्याच्या क्षमतेची जाण त्यांना असायची. ग्रास कोर्टवरील विंबल्डन तसेच हार्ड कोर्टवरील ऑस्ट्रेलियन ओपन व अमेरिकन ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धा त्याला फारशा भावल्या नाहीत. परंतु, चार वेळा त्याने अमेरिकन ओपनवर आपले नाव कोरले. तसेच प्रत्येकी दोनवेळा ऑस्ट्रेलियन व इंग्लिश भूमीवर ग्रँडस्लॅम विजेतेपद प्राप्त केले. खरी कमाल केली ती त्याने रोलंड गॅरोच्या लाल मातीवरील फ्रेंच ओपनमध्ये. 2005 साली सर्वप्रथम उपांत्य फेरीत रॉजर फेडरर व अंतिम फेरीत मारियानो पुर्टो याला पराजित करत 19 वर्षीय नदालने आपले पहिलेवहिले फ्रेंच ओपन विजेतेपद प्राप्त केले. ही स्पर्धा जिंकणारा पीट सँम्प्रास यांच्यानंतरची तो पहिलाच किशोरवयीन खेळाडू ठरला होता. विशेष म्हणजे हे जेतेपद पटकावताना त्याच्या पायाला दुखापत झाली होती. ही दुखापत घेऊन तो पुढील तब्बल 18 वर्षे खेळला. दुखापतीवर मात करताना त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. तब्बल 14 फ्रेंच ओपन किताब त्याने जिंकले. जागतिक क्रमवारीत 209 आठवडे अव्वल राहिलेल्या नदालने तब्बल पाच वेळा वर्षाची शेवट प्रथम स्थानावर राहून केली आहे. याशिवाय त्यानं ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकले आहे. त्याने 2008 च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकेरीत सुवर्णपदक आणि 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये दुहेरीत सुवर्णपदक जिंकले होते.
नदाल वयाच्या 12 व्या वर्षापर्यंत टेनिस आणि फुटबॉल दोन्ही खेळ खेळायचा. परंतु त्याच्या काकांची इच्छा होती की त्याने टेनिसमध्ये कारकीर्द घडवावी. नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, नदालचे काका टोनी नदाल हे एक प्रसिद्ध फुटबॉलपटू होते.
एकेरीत करिअर ‘गोल्डन स्लॅम’ पूर्ण करणाऱ्या केवळ तीन पुरुष खेळाडूंपैकी नदाल हा एक आहे. त्याने 2010 मध्ये ही कामगिरी केली होती. पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोवाक जोकोविचने सर्वाधिक 24 ग्रॅन्डस्लॅम खिताब जिंकले आहेत. यानंतर राफेल नदालचा क्रमांक लागतो, ज्याने 22 खिताब जिंकले. तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आहे. त्याने 20 ग्रँडस्लॅम खिताब जिंकले आहेत.
नदालच्या निवृत्तीमुळे टेनिसमधील एका युगाचा अंत जवळ आला आहे. फेडरर, नदाल व जोकोविच या त्रिकुटापैकी केवळ 37 वर्षीय जोकोविच सक्रिय आहे. नदालच्या निवृत्तीमुळे निर्माण झालेली पोकळी मात्र कधीच भरून न निघणारी अशीच असणार आहे.