राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांचे पुत्रे तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांना काल मोठा दिलासा मिळाला. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना जामीन मंजूर केला. लालू प्रसाद यादव हे रेल्वेमंत्री असताना रेल्वेच्या विविध विभागांमध्ये अपात्र उमेदवारांना नोकऱ्या देण्याच्या मोबदल्यात त्यांच्या कुटुंबीयांनी कथितरित्या जमिनी मिळवल्याचा आरोप आहे. सर्व आरोपींना प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर दिलासा देण्यात आला. आरोपपत्रात त्यांचा उल्लेख असला तरीही त्यांना अटक करण्यात आली नव्हती. आता या प्रकरणावर 23 आणि 24 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.