लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा

0
19

>> चारा घोटाळा प्रकरणी सीबीआय न्यायालयाचा निर्णय

चारा घोटाळ्यात डोरंडा कोषागारातून १३९.३५ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआय न्यायालयाने ५ वर्षांच्या शिक्षेसह ६० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच यादव यांच्यासह ३८ दोषींनाही शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात सीबीआयने एकूण १७० आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते, तर २६ सप्टेंबर २००५ ला १४८ आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले होते. या घोटाळ्यातील ५५ आरोपींचा मृत्यू झाला आहे. चार वेगवेगळ्या चारा घोटाळा प्रकरणात १४ वर्षांची शिक्षा झालेल्या लालूप्रसाद यादव यांच्यासह ९९ जणांविरुद्ध सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने २९ जानेवारीला आपला निकाल राखून ठेवला होता.

१५ फेब्रुवारीला रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश एस. के. शशी यांनी या सर्वांना दोषी ठरवले होते. यावेळी दोषी ठरलेल्या ३६ जणांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय २४ जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. उर्वरित दोषींच्या शिक्षेवरील सुनावणीसाठी २१ फेब्रुवारीची तारीख निश्चित केली होती. त्यानंतर सोमवारी लालू यादव यांच्यासह या प्रकरणातील ३८ दोषींनाही विशेष सीबीआय न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिक्षा सुनावली.
आता न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे लालू प्रसाद यादव यांच्या वकिलांनी सांगितले.