‘लाला की बस्ती’मधील बेकायदा घरे पाडणारच

0
1

न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही; मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी केले स्पष्ट

थिवी येथील ‘लाला की बस्ती’मधील बेकायदा घरे न्यायालयाच्या आदेशानुसार जमीनदोस्त केली जाणार आहेत, असे पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी पर्वरी येथे काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

‘लाला की बस्ती’ पाडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही होणार आहे. कोमुनिदाद प्रशासक आवश्यक त्या यंत्रणांच्या मदतीने लाला की बस्ती पाडण्याची कार्यवाही करणार आहे, असे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी स्पष्ट केले.

‘लाला की बस्ती’ पाडण्याचा आदेश 2010 सालीच देण्यात आला आहे. या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयानेही आव्हान याचिका फेटाळल्याने आता कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. हा विषय गेल्या 15 वर्षांपासून प्रलंबित आहे. थिवी कोमुनिदादनेच ‘लाला की बस्ती’ पाडण्यासाठी प्रथम न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता आदेशाची कार्यवाही कोमुनिदाद प्रशासकाला करावी लागणार आहे. पोलीस, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच इतर संबंधित यंत्रणांच्या सहकार्यातून आदेशाची कार्यवाही होणार आहे, असे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी सांगितले.

दरम्यान, थिवी कोमुनिदादच्या जमिनीत 343/14 व 343/12 या सर्व्हे मधील बेकायदा बांधकामे 11 मार्चनंतर केव्हाही पाडण्यात येतील, अशी नोटीस गेल्या महिन्यात सुमारे 25 घरांना देण्यात आली आहे.