लाजीरवाणे

0
8

गेली 357 वर्षे समुद्राच्या लाटांच्या अहोरात्र धडका सोसत आणि वादळवाऱ्याला तोंड देत शिवलंका सिंधुदुर्ग आजही भक्कमपणे उभा आहे, परंतु गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जवळच्या राजकोटावर उभारलेला अठ्ठावीस फुटांचा शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मात्र अवघ्या आठ महिन्यांत कोसळावा ही खरोखर शरमेची बाब आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईने ह्या पुतळ्याचे अनावरण गेल्या वर्षअखेरीस करण्यात आलेले होते. परंतु अशा प्रकारच्या मोठ्या कामाचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या अवघ्या 24 वर्षांच्या मुलाला ह्या पुतळ्याचे दिले गेलेले काम आणि त्यात ही घिसाडघाई यामुळे हा शिवपुतळा अशा प्रकारे कोसळून पडला. आता हा शिवपुतळा का कोसळला ह्याची अत्यंत बाष्कळ कारणे महाराष्ट्र सरकारकडून पुढे केली जात आहेत. ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहत होते म्हणून पुतळा कोसळला असे एक कारण आपल्या बचावार्थ पुढे केले गेले. समुद्रकिनारी पंचेचाळीसच का, वादळ येते तेव्हा ताशी शंभर – सव्वाशे किलोमीटर वेगाचे वारे देखील वाहत असतात. असे असताना समुद्रकिनारी हा पुतळा उभारताना अशा प्रकारच्या वादळी वाऱ्याला तो तोंड कसे देईल ह्याचा विचार तर सर्वांत आधी व्हायला हवा होता. शिवाय ह्या वेगवान वाऱ्याने एक झाडही त्या भागात पडलेले नाही. मग पुतळा कसा काय पडला? मग दुसरे कारण पुढे करण्यात आले की पुतळ्याचे नट – बोल्ट खाऱ्या वाऱ्यामुळे गंजले. अहो, शेजारचा सिंधुदुर्ग तीन शतकांपूर्वी कोणतेही विकसित तंत्रज्ञान नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढा भक्कमपणे उभारलेला समोर दिसत असताना आजच्या एकविसाव्या शतकात समुद्राच्या खाऱ्या पाण्याला तोंड देतील अशा प्रकारचे गंजरोधक उच्च दर्जाच्या पोलादाचे नट – बोल्ट वापरता येऊ नयेत? खारे वारे काय फक्त मालवणातच वाहतात काय? अमेरिकेत स्टॅच्यू ऑफ लिबर्टी गेली 138 वर्षे एका बेटावर उभा आहे. जगभरामध्ये असे असंख्य पुतळे खाऱ्या वाऱ्याला तोंड देत उभे आहेतच ना? प्रशासन जर प्रामाणिक असेल तर किती उच्च गुणवत्तेचे काम उभे राहू शकते ह्याची साक्ष देत भर समुद्रात सिंधुदुर्ग किल्ला आजही ताठ मानेने उभा आहे. सिंधुदुर्ग उभारताना ‘अवघे काम चखोट (चोख) करणे’ असे आदेश छत्रपतींनी ह्या किल्ल्याच्या बांधकामावर देखरेख ठेवणाऱ्या गोविंद विश्वनाथ प्रभू यांना दिले होते. खरोखरच अत्यंत चोखपणे अठरा टोपीकरांच्या उरावर ही भक्कम शिवलंका त्या काळी पंचखंडी शिशाच्या रसातून उभी राहिली. आज मात्र भ्रष्टाचार आणि दलालीच्या दलदलीत अशी गुणवत्ता दिसायलाही दुर्मीळ झालेली आहे. अयोध्येतील राममंदिराला आणि नव्या संसद भवनाला गळती काय लागते, बिहारमध्ये डझनावारी पूल काय कोसळतात, गोव्यातले काल बनवलेले रस्ते आज वाहून काय जातात. ‘ना खाऊंगा आणि खाने दुँगा’ची गर्जना करणाऱ्या पंतप्रधानांच्या कारकिर्दीतच जर अशा प्रकारची निकृष्ट कामे होत असतील, तर त्या भीमगर्जनेला अर्थ काय राहिला? ह्या पुतळ्याचे कंत्राट देताना गुणवत्तेपेक्षा हितसंबंधांना अधिक प्राधान्य दिले गेले होते काय असा सवाल आज विचारला गेला जात आहे यात नवल नाही. पुतळा पडल्यानंतर सरकारमधील एक महाशय तर म्हणाले की ‘वाईटातून चांगले घडते त्याप्रमाणे आता त्या ठिकाणी शंभर फुटांचा पुतळा उभारू.’ हे तर ‘पडलो तरी नाक वर’ अशा प्रकारचे विधान झाले! मुळात हा पुतळा कोसळला ह्याची कसून चौकशी करून दोषींच्या मुसक्या आवळण्याऐवजी संबंधितांना फरार होण्याची संधी मिळवून देऊन महाराष्ट्रातील सत्ताधारी नेते नौदलावर खापर फोडून नामानिराळे होऊ पाहत आहेत असे दिसते. यंदा वर्षअखेरीस राज्याच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. त्यामुळे ह्या घटनेचे राजकारण तर होणारच. काल महाविकास आघाडीने मालवणात दुर्घटनास्थळी दौरा आखला, तेव्हा तेथे भाजपच्या काही स्थानिक नेत्यांकडून पोरकटपणाचा कळस झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्यावर रोखून काय धरण्यात आले, कार्यकर्त्यांना मारबडव काय झाली! आपण शिवस्मारकाच्या पवित्र ठिकाणी आहोत ह्याचाही विसर ह्या राजकीय बुरख्याखालील गुंडांना पडावा हे आजच्या नेत्यांची पातळी दर्शवते. येथे एक सर्वांत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे जरूरी आहे तो म्हणजे हा केवळ शिवपुतळा पडलेला नाही. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील कोट्यवधी शिवभक्तांच्या ह्रदयावर ह्या घटनेने घणाघात झालेला आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा आठ महिन्यांत कोसळतो याची काही तरी लाज, शरम ह्या नेत्यांनी बाळगावी आणि घडलेल्या चुकीचे समर्थन करण्याऐवजी दोषींवर कठोर कारवाई करून ह्या पापाच्या परिमार्जनाचा प्रयत्न करावा.