भारतीय जनता पक्षाचे दिवंगत, परंतु उत्तुंग नेते पद्मविभूषण मनोहर पर्रीकर यांच्यावर जाहीरपणे जहरी टीका करून अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर वशिलेबाजी आणि भ्रष्टाचाराचा बेछूट आरोप खुद्द भाजपच्याच सरकारमधील मंत्री बाबूश मोन्सेर्रात यांनी नुकताच केला. मात्र, त्यांची त्याबद्दल मंत्रिपदावरून हकालपट्टी सोडाच, किमान कानउघाडणी करण्याऐवजी मुख्यमंत्र्यांसह भाजपचे यच्चयावत नेतृत्व त्यावर मूग गिळून गप्प बसले आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? मोन्सेर्रात यांनी केलेल्या बेछूट आरोपांशी विद्यमान गोवा भाजप सहमत आहे असा घ्यायचा की पर्रीकरांचा वारसा पूर्णपणे संपला आहे हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठीच संबंधितांचे हे सोईस्कर मौन आहे असे मानायचे? ज्या मनोहर पर्रीकरांनी गोव्यात भाजपला त्याचे पहिलेवहिले सरकार सत्तारूढ करून दिले, येथील अल्पसंख्यकांना विश्वास देत त्यांच्यामध्ये भाजप रुजवला, इतकेच नव्हे, तर त्यांच्यातून नवे नेते निर्माण केले, देशाचे संरक्षणमंत्री म्हणून निष्कलंक कारकीर्द गाजवली, अशा चारित्र्यवान नेत्यावर सरळसरळ भ्रष्टाचाराच्या आरोपाचे शिंतोडे उडवणाऱ्या ह्या उपटसुंभाला पक्ष त्याची जागा दाखवून देणार आहे की नाही? गोवा भाजप आज खरे म्हणजे नावापुरताच भाजप राहिला आहे असे जनमत बनले आहे. 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या भाजपच्या केडरचे पानीपत झाले आणि नाना दिशांनी आलेले मुंगळे सत्तेच्या गुळाचा चिकटले. त्यांना ना पक्षाचा इतिहास ठाऊक, ना त्याच्या वारशाशी काही देणेघेणे. भारतीय जनता पक्ष आणि त्याचे पूर्वरूप असलेला भारतीय जनसंघ उभा करण्यासाठी नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी काय खस्ता खाल्ल्या, किती कष्ट केले, किती अवहेलना सोसली हे गावीही नसलेली ही मंडळी. पं. दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावापलीकडे ओ की ठो ठाऊक नसलेल्यांना भाजपचा वैचारिक वारसा ठाऊक असण्याची तर कल्पनाही करता येत नाही. परंतु त्या वैचारिक मुशीतून घडलेल्या कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम तरी त्यांनी किमान करू नये अशी अपेक्षा बाळगणे गैर नसावे. काजव्याने सूर्यावर थुंकावे तसे बाबूश पर्रीकरांवर पचकले आहेत. स्मार्ट सिटीसाठी सल्लागार नेमताना पर्रीकरांनी पात्रता नसलेल्या आपल्या जुन्या मित्रांनाच कामे दिली असा एक आरोप बाबूश यांनी केला आहे. मनोहर पर्रीकर यांना जे जवळून ओळखतात ते निश्चितपणे आणि निःसंदिग्धपणे सांगू शकतील की त्यांचा त्यामागे कोणताही आर्थिक स्वार्थ नव्हता. जे निर्णय त्यांनी घेतले ते पणजीच्या भल्यासाठीच घेतले. त्या सद्भावनेनेच घेतले. त्याचा कोणी पुढे गैरफायदा घेतला असेल, त्यांच्या आजारपणाचा फायदा उठवून गैरप्रकार केले असतील, तर तो दोष पर्रीकरांना देता येणार नाही. शिवाय आपल्यावरील आरोपांना उत्तर द्यायला पर्रीकर आज हयात नाहीत. ते हयात असते तर त्यांनी प्रत्येक आरोपाचे सप्रमाण उत्तर दिलेच असते. पर्रीकरांनी पंचवीस वर्षांत पणजीसाठी काहीच केले नाही असा बेछूट आरोपही मोन्सेर्रात करून मोकळे झाले. पणजी शहराच्या समस्या सोडविण्याचे आणि तिच्या सौंदर्यात भर घालण्याचे काम पर्रीकरांनी आपल्या आमदारकीच्या काळात निश्चितपणे केले. त्यांच्याच प्रयत्नांनी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आला आणि त्यानिमित्ताने पणजीचे आधुनिकीकरण आणि सुशोभीकरण झाले. जुन्या पडीक इमारतींना नवा साज दिला गेला, नवा पाटो पूल उभारला गेला, भविष्यातील वाहतुकीची गरज लक्षात घेऊन अटल सेतू त्यांच्याच दूरदृष्टीतून उभा राहिला, पणजीच का, संपूर्ण गोव्यामध्ये जे पुलांचे, महामार्गांचे आणि प्रकल्पांचे जाळे आज उभे दिसते, ते पर्रीकरांच्याच प्रयत्नांतून उभे झालेले आहे. पर्रीकरांच्या मृत्यूनंतर प्रमोद सावंत सरकार सत्तेवर आले तेव्हा पर्रीकरांचीच आजारपणामुळे अपुरी राहिलेली कामे पूर्ण करण्यात त्यांची पहिली काही वर्षे गेली होती. हे नाकारणे हा कृतघ्नपणा ठरेल. परंतु बाटग्याची बांग अधिक मोठी असते म्हणतात तद्वत मोन्सेर्रात यांंनी पर्रीकरांवर शरसंधान करून आपल्या नव्या धन्यांची मर्जी संपादन करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवलेला दिसतो. प्रश्न एवढाच आहे की भाजपला हे आरोप मान्य आहेत काय? मनोहर पर्रीकर हे केवळ गोव्याचे नेते राहिले नव्हते. देशाचे संरक्षणमंत्रिपद भूषविलेले ते भाजपचे एक राष्ट्रीय नेते होते. अशा आपल्या नेत्यावरील ही बेछूट चिखलफेक निमूट सहन करून भाजप नेते कोणता संदेश जनतेला देऊ इच्छित आहेत? गुंडगिरीचे आणि बलात्काराचे गंभीर आरोप असलेल्या बाहुबलीपुढे निमूट शरणागती पत्करल्याचा? झाडाला चिकटलेली बांडगुळे त्याच्याच खाण्यापिण्यावर जगतात आणि वेळीच छाटली गेली नाहीत, तर कालांतराने मूळ झाडच कमकुवत करतात. गोवा भाजपने ह्याचे स्मरण जरूर ठेवायला हवे.