लाच प्रकरणी माजी सरकारी अधिकाऱ्यास तुरुंगवासाची शिक्षा

0
8

येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने माजी सरकारी अधिकारी पी. के. पटीदार यांना वर्ष 2010 मधील एका लाच प्रकरणी 1 वर्ष कारावास आणि 35 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
राज्य पशुसंवर्धन खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा सांभाळत असताना पी. के. पटीदार यांना एका कंत्राटदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी दक्षता खात्याच्या विभागाने वर्ष 2015 मध्ये पटीदार यांच्याविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.

राज्य सरकारने वर्ष 2010 मध्ये पटीदार यांची सहकार निबंधकपदी नियुक्ती केली होती. तसेच, पशुसंवर्धन खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त पदभार दिला होता. पशुसंर्वधन खात्याच्या धाट आणि कोपर्डे फार्ममध्ये पशुखाद्य पुरवठा केलेल्या कंत्राटदाराचे बिल फेडण्यासाठी बिलाच्या रक्कमेतील 10 टक्के रक्कम देण्याची मागणी त्यांनी केली होती. कंत्राटदाराचे सुमारे 23 लाख रुपयांचे पशुखाद्याचे बिल प्रलंबित होते. कंत्राटदाराने त्यातील 2 लाख 30 हजार रुपये देण्याचे मान्य केले. त्यानंतर कंत्राटदाराने दक्षता खात्याच्या भ्रष्टाचार विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. 29 जून 2010 रोजी कंत्राटदाराकडून 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना पटीदार यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते.