लाच प्रकरणी पंचाविरुद्ध गुन्हा नोंद

0
21

साल्वादोर द मुंद येथील एका विद्यमान पंच सदस्याने सुमारे 18 लाखांची लाच घेतल्याचा आरोप करत, त्याबाबतची एक तक्रार पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणी पंच सदस्य कृष्णकांत चोडणकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, चोडणकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

सविस्तर माहितीनुसार, साल्वादोर द मुंद येथील सर्व्हे क्र.155/5 मधील एका बांधकामाकरिता पंचायतीच्या परवाना मिळवण्यासाठी नोएल फेलिक्स अथायद (जमिनीचे मालक ऑस्कर ओर्लांदो दो रोजारिओ अथायद यांचे कायदेशीर अटर्नी) यांनी अर्ज केला होता, परंतु पंचायतीने बांधकाम परवाना देण्यास टाळाटाळ करून सतावणूक केल्याचे तक्रारदार सुनील संजय दळवी यांनी पर्वरी पोलीस स्थानकात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
पंच सदस्य कृष्णकांत चोडणकर यांनी बांधकाम परवान्यासाठी 30 लाखांची लाच मागितली. यादरम्यान सदर पंचाने सतावणूक करून दोन वेळा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळे वाटाघाटी करून 30 लाखांऐवजी 18 लाख रुपये दि. 5 जून 2023 ला चोडणकर यांना दिले आणि दि. 6 जून 2023 रोजी बांधकामासाठीचा परवाना देण्यात आला, असेही सुनील दळवी यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कृष्णकांत चोडणकर यांच्याविरूद्ध पर्वरी पोलीस स्थानकात सतावणूक, खंडणी, अपशब्द वापरल्याबद्दल आणि लाच घेतल्याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी भा. दं. सं. 7 (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा क्र. 1988) आणि कलम 506(2) खाली गुन्हा नोंदवला आहे. उपअधीक्षक विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.