लाच प्रकरणात आयकरचा आणखी 1 अधिकारी अटकेत

0
8

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) गोवा शाखेने आयकर खात्याच्या लेखा विभागातील लाच प्रकरणात आणखी एका अधिकाऱ्याला काल अटक केली. आयकर विभागातील अधिकारी अतुल वाणी यांच्यानंतर आणखी एक अधिकारी पंकज कुमार याला अटक करण्यात आली. दोघांनाही 7 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

आयकर खात्याला मनुष्यबळ सेवा पुरवणाऱ्या राज एंटरप्राईजेस या कंपनीचे सात महिन्यांचे प्रलंबित बिल देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. ही लाच न दिल्यास बिलाची रक्कम दिली जाणार नसल्याचे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सांगितले होते. बिल फेडण्यासाठीच्या रकमेवर वाटाघाटी केल्यानंतर 1 लाख रुपयांवर समझोता झाला होता. राज एंटरप्राईजेसचे मालक कमलाकांत चतुर्वेदी यांनी सीबीआय गोवा विभागाकडे या लाच प्रकरणी 13 नोव्हेंबरला लेखी तक्रार नोंदवली होती. सीबीआय गोवाच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाने या प्रकरणी शहानिशा केल्यानंतर संशयितांना रंगेहाथ पकडण्यासाठी गुरुवारी सापळा रचला होता. सीबीआयच्या पथकाने गुरुवारी दुपारी पाटो-पणजी येथे 1 लाख रुपयांची लाच घेताना अतुल वाणी याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. त्यावेळी या प्रकरणामध्ये पंकज कुमार गुंतल्याचे स्पष्ट झाले होते. सीबीआयच्या पथकाने संशयितांचे कार्यालय, तसेच दोघांच्याही घरांची झडती घेऊन आवश्यक दस्तऐवज जप्त केले.