लाच घेताना आयकरच्या अधिकाऱ्यास रंगेहात अटक

0
9

>> पाटो-पणजी येथे सीबीआयची कारवाई

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने पाटो-पणजी येथे राज्य मध्यवर्ती वाचनालयाजवळ एका कारवर छापा टाकून लाच स्वीकारणाऱ्या आयकर खात्याच्या एका अधिकाऱ्याला काल रंगेहात पकडले. अतुल वाणी असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

पाटो-पणजी येथील आयकर विभागात एका कंपनीचे प्रलंबित असलेले काम हातावेगळे करण्यासाठी लाच मागण्यात आली होती. सदर कंपनीने याबाबत सीबीआय कार्यालयाला माहिती दिल्यानंतर सापळा रचून लाच स्वीकारणाऱ्या अतुल वाणी याला रंगेहाथ पकडण्यात आले. सीबीआयच्या सुमारे 10 ते 12 अधिकाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली. रस्त्यावरच ही कारवाई सुरू असल्याचे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. संशयित आरोपी अतुल वाणी याच्या हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले आहेत. तसेच, पैशांवरील हाताच्या बोटांचे ठसे घेण्यात आले. त्यानंतर सीबीआयच्या पथकाने येथील आयकर खात्याच्या कार्यालयात अधिकारी अतुल वाणी याला नेऊन त्या अधिकाऱ्याच्या केबिनची झडती घेतली. या प्रकरणी सीबीआयच्या पथकाकडून अधिक तपास केला जात आहे.