लाचखोर कारकूनास काणकोणात अटक

0
60

भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या एका तुकडीने छापा घालून काल काणकोणच्या सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालयातील ज्युलीयस जुआनिस या ज्येष्ठ कारकूनाला एका महिलेकडून लाच घेताना रंगेहात पकडले. या पथकामध्ये उपाधिक्षक बॉसेट डिसिल्वा, निरीक्षक फ्रान्सिस्क कोर्त व निरीक्षक राहुल परब यांचा समावेश होता. भाटपाल येथील ब्रँडा पेरेरा या महिलेने १६ मार्च रोजी नावातील दुरुस्ती करण्यासाठी अर्ज सादर केला होता. या कालावधीत तिने कित्येक खेपा मारूनही दर वेळी तिला परत पाठविण्यात आले. तिचे काम होण्यासाठी १७०० रुपये द्यावे लागतील असे तिला सांगण्यात

आले. अखेर ही गोष्ट सदर महिलेने काणकोणचे आम आदमीचे कार्यकर्ते संदेश तेलेकर यांच्या कानावर घातल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून लाच देताना सदर कर्मचार्‍याला पकडण्यात आले. सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालयात भ्रष्टाचारविरोधी पथकाने अचानक छापा मारल्यानंतर एकच गोंधळ उडाला. रात्रौ उशीरापर्यंत जबानी घेण्याचे काम चालू होते. सदर कार्यालयात अशा प्रकारच्या कित्येक तक्रारी असून साध्यासुध्या कामासाठी पुष्कळ वेळा खेपा माराव्या लागतात. लाचखोरीचे प्रकरण उघड झाले असल्याने आता तरी सरकारी कर्मचार्‍यांनी लोकांची सेवा प्रामाणिकपणे करावी असे मत संदेश तेलेकर यांनी व्यक्त केले.