शिवोली येथे विजेचा धक्का लागून लाईन हेल्परच्या मृत्यू प्रकरणी साहाय्यक लाईनमनला निलंबित करण्यात आला असून, कनिष्ठ अभियंत्यांची खातेनिहाय चौकशी सुरू आहे, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काल दिली.
शिवोली येथे मागील आठवड्यात लाईन हेल्पर कृष्णा पवार यांचा विजेचा धक्का बसल्याने मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी लाइनमन आणि कनिष्ठ अभियंता यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. त्यानंतर वीजमंत्री ढवळीकर यांनी मुख्य वीज अभियंत्यांना कृष्णा पवार याच्या मृत्यू प्रकरणी खातेनिहाय चौकशीचा आदेश दिला होता.
कृष्णा पवार याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असून, साहाय्यक लाइनमनला निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी कनिष्ठ अभियंत्यांची चौकशी सुरू आहे, अशी माहिती ढवळीकर यांनी दिली.
कृष्णा पवार यांच्या कुटुंबीयांना एक-दोन महिन्यांत नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. तसेच, कुटुंबातील व्यक्तीची सरकारी सेवेत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती केली जाणार आहे. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीला थोडा वेळ लागणार आहे. कारण सोपस्कार आवश्यक नियमानुसार केले जाणार आहेत, असेही ढवळीकर यांनी सांगितले.