लांच्छन

0
154

देश – विदेशामध्ये जवळजवळ चारशे छोटे – मोठे आश्रम, शाळा, गोशाळा मिळून जवळजवळ दहा हजार कोटींचे साम्राज्य असलेल्या आसाराम बापूला काल जोधपूर न्यायालयाने अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या एका प्रकरणात दोषी धरले आणि जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सूरतमधील दोघी बहिणींनी आसाराम व मुलगा नारायण साई यांच्याविरुद्ध दिलेल्या अशाच प्रकारच्या तक्रारींचा खटलाही अजून सुरू आहे. आपल्या देशातील प्रदीर्घ न्यायप्रक्रिया लक्षात घेता काल सुनावली गेेलेली शिक्षा काही अंतिम ठरू शकत नाही. बचावाचा आटोकाट प्रयत्न यापुढेही केला जाईल. खटल्यातील फुटलेले, मारले गेलेले साक्षीदार पाहिल्यास खरोखरच पुढील टप्प्यांमध्ये गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याची सजा मिळणार का याबाबत साशंकताच वाटते. आसाराम खटल्यातील तीन साक्षीदारांची आजवर हत्या झालेली आहे. त्याचा एकेकाळचा आयुर्वेदिक डॉक्टर अमृत प्रजापती याची राजकोटमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली. दुसरा साक्षीदार स्वयंपाकी अखिल गुप्ता याला त्याच पद्धतीने उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूरमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. तिसरा साक्षीदार कृपालसिंग याला शहाजहानपूर जिल्ह्यात त्याच प्रकारे ठार मारण्यात आले. दिनेश भागचंदानी या साक्षीदारावर ऍसिड फेकले गेले, राहुल सचन हा साक्षीदार गूढरीत्या बेपत्ता आहे. राहुल पटेल, विमलेश ठक्कर, राजू चांडक यांच्यावर खुनी हल्ले झाले आहेत. काही साक्षीदार उलटले आहेत, काही बेपत्ता झाले आहेत, सध्याच्या खटल्यातील प्रमुख साक्षीदार आपल्या जिवाला धोका असल्याचे सांगतो आहे. हे सगळे पाहिल्यास हा खटला पुढील काळात कितपत टिकेल याबाबत साशंकता निर्माण झाली नाही तरच नवल! साक्षीदारच उरणार नसतील तर वरिष्ठ न्यायालयांत असे खटले टिकणार कसे आणि शिक्षा होणार कशी? आसाराम गुन्हेगार असल्याचे मानायला आजही त्याचे लक्षावधी भक्त तयार नाहीत. त्यांना हा सगळा बनवाबनवीचा प्रकार वाटतो. त्यांच्यासाठी तो आजही देवस्वरूप आहे. आसारामचे दुबई, टोरंटो, युगांडा, लंडन असे विदेशांत आणि भारतातील वीस राज्यांमध्ये आश्रम आहेत. शाळा आहेत, गोशाळा आहेत. गेली सहा वर्षे आसाराम तुरुंगात असूनही हे सगळे सुरळीतरीत्या सुरू आहे. बिंग फुटल्यानंतर नव्या भक्तांचा ओघ थोडा कमी झाला असेल एवढेच. पण हे सगळे थंड झाल्यावर तो पुन्हा वाढणारच नाही, लाखोंचे सत्संग पुन्हा लागणारच नाहीत असे नाही. असुमल थौमल हरपालनी नावाचा एक केवळ तिसरीपर्यंत शिकलेला आणि टांगा चालवणारा गरीब मुलगा हजारो कोटींचे हे साम्राज्य उभारू शकला ते अशाच भाबड्या भक्तांच्या बळावर. एकेकाळी आठ – दहा भक्त नादी लागलेल्या आसारामचे आज देश विदेशात लाखो भक्त कसे निर्माण झाले? आजही त्याच्या संस्थेचे संकेतस्थळ उघडले तर त्यावर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी, अब्दुल कलाम, वाजपेयी, अडवाणी यांच्यापासून कॉंग्रेसचे कपील सिब्बल, कमलनाथ वगैरेंपर्यंत मान्यवर मंडळींचे उदंड कौतुकाचे संदेश दिसतात. आज सर्वत्र बाबांचा सुळसुळाट वाढला आहे तो अशा सर्व पक्षीय राजकारण्यांच्याच कृपेने. बाबा मंडळी राजकारण्यांना आपल्या एकगठ्ठा मतपेढीचे आमीष दाखवते, गरजेला आर्थिक मदतही करते आणि कृपावंत राजकारणी मंडळी मग आपापल्या बाबांना आश्रम उभारण्यासाठी हजारो चौरस मीटर जमिनी देऊन आणि त्यांच्या चरणांशी जाहीररीत्या लीन होऊन आपल्या निष्ठेची ग्वाही देते. राजाश्रयातूनच अशी साम्राज्ये मग हळूहळू उभी राहतात, विस्तारतात आणि धर्माच्या नावे धंदा तेजीत येतो. राजकारणी, राजकीय पक्ष यांच्यासाठी अशी साम्राज्ये सोयीची असतात. पण आजवर करबुडवेगिरीपासून लैंगिक अत्याचारापर्यंतच्या प्रकरणांनी अशा अनेक भोंदू बाबांनी आपला महान हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती यांना बदनाम केले आहे. रामपाल काय, राम रहीम काय, राधे मॉं काय… एकेक नमुना शरमेने मान खाली घालायला लावणारा आहे. धर्म, अध्यात्म यांचा शतकानुशतके चालत आलेला महान वारसा आजच्या मानवी जीवनातील हरवत चाललेली जीवनमूल्ये जपत, आपले ताणतणाव आणि व्यथा वेदना दूर करीत आपल्याला मनःस्वास्थ्य बहाल करील ह्या अपेक्षेने माणसे चुंबकासारखी अशा मंडळींकडेे खेचली जातच राहतात आणि मग काही चतुर, धूर्त बाबा मंडळी अशा आपल्या आहारी आयत्या आलेल्या लोकांचे यथास्थित आर्थिक, शारीरिक शोषण करून मजा लुटतात. अशा मंडळींचा सर्वत्र सुळसुळाट वाढावा हे खरे तर हिंदू धर्मावरील लांच्छन आहे. खर्‍या खोट्याचा विवेक समाजातून हरवत चाललेला आहे. वैध – अवैध मार्गांनी, विदेशी साह्यातून मिळवलेली अफाट धनसंपत्ती, त्या बळावर उभारलेली मायानगरी आणि त्या इंद्रजालातून पसरत गेलेला भुलभुलैय्या हे आता नेहमीचे झाले आहे. कधी तरी मग अशा मंडळींचे बिंग फुटते आणि जे काही वास्तव उघडे पडते ते अचंबित करणारे असते, हादरवून टाकणारे असते. परंतु त्यातूनही समाज काही शिकत नाही हेच तर खरे दुर्दैव आहे!