>> डीसीजीआयकडून कोवॅक्सिन, कोर्बेवॅक्स, झायकोव्ह डी लसीच्या आपत्कालीन वापरास परवानगी
भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय)ने ५ ते १२, ६ ते १२ आणि १२ वर्षांवरील वयोगटातील मुलांसाठी तीन लसींच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी काल दिली. डीसीजीआयच्या विषय तज्ज्ञ समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.
मनसुख मांडवीय यांनी लहान मुलांच्या लसीकरणासाठी कोणत्या लसींना परवानगी देण्यात आली आहे, या संदर्भात काल एक ट्विट केले. भारतीय केंद्रीय औषध नियंत्रकांतर्फे लहान मुलांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी कोवॅक्सिन, कोर्बेवॅक्स आणि झायकोव्ह डी या लसींना मंजुरी देत असल्याचे जाहीर केले.
६ ते १२ वयोगटातील मुलांना भारत बायोटेकने बनवलेली कोवॅक्सिन, तर बायोलॉजिकल ई या कंपनीकडून तयार करण्यात आलेली कोर्बेवॅक्स लस ५ ते १२ वर्षांच्या मुलांना देण्यात येणार आहे. १२ वर्षांवरील मुलांसाठी झायकोव्ह डी लसीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
मनसुख मांडवीय यांनी कोरोनाविरुद्धची लढाई आता आणखी मजबूत झाल्याचे म्हटले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी तीन लसींना आपत्कालीन वापरासाठी परवानगी दिल्याची माहिती दिली; मात्र लसीकरण कधी सुरू होणार याबाबत माहिती दिलेली नाही.
कोणत्या वयोगटासाठी कोणती लस?
५ ते १२ वर्षांच्या मुलांना कोर्बेवॅक्स लस
६ ते १२ वर्षांच्या मुलांना कोवॅक्सिन लस
१२ वर्षांवरील मुलांना झायकोव्ह डी लस