लष्कराला आता चिंता स्नायपर्सची

0
143
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तोयबाच्या जिहाद्यांद्वारा होणार्‍या स्नायपर रायफलचा वापर सेना आणि अर्ध सैनिकदलांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. माणसे न गमावता सुरक्षा दलांची जीवहानी करण्यासाठी ‘स्नायपर फायर’ हाच एकमेव पर्याय जिहाद्यांकडे उरला आहे. आपल्या मुजाहीदिनांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी आयएसआय यापुढे स्नायपर्सचा उपयोग करेल यात शंकाच नाही.

अलीकडेच अमरनाथ यात्रेवर स्नायपर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट असल्याने ही यात्रा स्थगित करण्यात आली. जैश ए मोहम्मद आणि लश्कर ए तैय्यबाच्या जिहाद्यांद्वारा होणार्‍या स्नायपर रायफलचा वापर सेना आणि अर्ध सैनिकदलांसाठी चिंतेचा विषय झाला आहे. सुरक्षादलांनी अंतर्गत भागातील आपली कार्यपद्धती बदलण्याची वेळ आता आली आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही. पारंपारिक युद्धात स्नायपरचा वापर शत्रूचा एकांडा पहारेकरी, मशीनगन पोस्ट किंवा पेट्रोल लीडर, वरिष्ठ अधिकारी अथवा हेलीकॉपटर पायलट यांसारख्यांवर लांबून मारा करण्यासाठी केला जातो. असे लोक एकाएकी, न दिसणार्‍या शत्रूच्या मार्‍याखाली आल्यामुळे त्या ठिकाणांवर बेदिली माजते, संभ्रम निर्माण होतो आणि अशा मार्‍यास प्रत्युत्तर देण्यास वेळ लागतो.

‘हाफ वोल्फ हाफजॅक रॅबिट’ या टोपण नावाने प्रसिद्ध असणारा फ्रेडरिक रसेल बर्नहॅम हा ब्रिटीश ‘लोव्हॅट स्काऊटस’ या स्नायपर युनिटचा पहिला कमांडिंग ऑफिसर होता. मात्र, अमेरिकन मेजर जॉन प्लास्टरने व्हिएतनाम, लाओस व कंबोडियामधील त्याच्या तैनातींनंतर लिहिलेले ‘अल्टीमेट स्नायपर’ हे पुस्तक स्नायपर्सची गीता आहे. २००६ मध्ये इराकमध्ये २० अमेरिकन सैनिकांची हत्या करणार्‍या जुबा या टोपण नावाने वावरणार्‍या स्नायपरने ‘ज्युबा द स्नायपर’ या इराकी व्हिडियोमध्ये या पुस्तकाचा संदर्भ दिल्यावर लोकांची याबद्दलची उत्सुकता अचानकच वाढली आणि हे पुस्तक जगप्रसिद्ध झाले. स्नायपर म्हणजे लपलेल्या ठिकाणाहून दूरवरील शत्रूवर गोळीबार करणारा बंदुकधारी सैनिक. तो एका विवक्षित ठिकाणी दबा धरून बसतो आणि आपल्या सावजाचा फडशा पडतो. चालत्या गस्तीपथकावर दूरवरून मारा करून फायर सपोर्ट देणार्‍याला मार्कस्मन म्हणतात. दुश्मन शिकार, हम शिकारी हे प्रत्येक स्नायपरचे बोधवाक्य असते.

पाकिस्तानची कुख्यात इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स एजन्सी (आयएसआय) भारतीय सैनिकांना मारण्यासाठी त्यांच्या जिहादी स्नायपर्सना खडतर प्रशिक्षण देत आहे. मागील काही दिवसांत काश्मीर खोर्‍यामध्ये भारतीय सैनिकांवर चारदा स्नायपर ऍटॅक झाले आहेत. हे सर्व हल्ले रात्रीच्या वेळी किंवा सकाळ व्हायच्या तासभर आधीच झालेत. ही स्नायपर रायफल पाकिस्तानी आर्मी देखील वापरते. ‘भारतीय सेना काश्मीरमध्ये स्नायपर रायफल्स आल्यात का याचा तपास करते आहे’ असे वक्तव्य सेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांनी केले होते.

खरे तर काश्मिरमधील पहिला स्नायपर हल्ला गतवर्षी १८ सप्टेम्बर रोजी नेवा, पुलवामात एका सीआरपीएफ जवानावर झाला; पण सुदैवाने तो फक्त जखमीच झाला. हा एक एकांडा हल्ला आहे, असे त्यावेळी सेनाधिकार्‍यांना वाटले होते. पण त्यानंतरच्या तीन स्नायपर हल्ल्यांमध्ये त्राल क्षेत्रात सीमा सुरक्षा बलाचा एक आणि सेनेचा एक जवान तसच नौगावमध्ये सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सचा जवान शहीद झाला आणि इंटेलीजंस एजन्सीना जाग आली आणि याबाबत शोध सुरू झाला.
मिळालेल्या इंटेलिजन्सनुसार, प्रत्येकी दोन जिहादी असलेल्या दोन वेगवेगळया बडी ग्रुप्सनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच दक्षिण काश्मिरच्या पुलवामामध्ये प्रवेश केला असून त्यांच्याकडे, अफगाणिस्तानमध्ये नाटो फोर्सेस वापरत असलेल्या एम ४ स्नायपर रायफल्स आहेत. या रायफल्स जैश आणि लश्करला, ते ज्यांच्या बरोबरीने अफगाणिस्तानमध्ये लढलेत त्या अफगाण तालिबान्यांनी दिली असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ह्या स्नायपर रायफल्स पाकिस्तानी आर्मीचे स्पेशल फोर्सेस वापरतात. काश्मीरमध्ये या जिहादी स्नायपर्सना, त्यांचे समर्थक असलेल्या ‘ओव्हर ग्राउंड वर्कर्स’ची मदतही मिळते आहे. जैशचा मीर कासीम भाई आणि दोन पाश्चात्य व एक काश्मिरी तरुण या चारदलीय टीमचे सदस्य आहेत.

जिहादी स्नायपर्सनी सुरक्षादलांच्या ठिकाणांजवळील उंच टेकडयांवरून, रात्रीच्या वेळी आपले मित्र किंवा कुटुंबियांशी मोबाईलवर बोलणार्‍या अथवा इयरप्लग लावून मोबाईलवरील गाणी ऐकणार्‍या जवानांवर दूरवरून दिसणार्‍या त्या मोबाइल लाईटचा भेद घेऊन हा स्नायपर हल्ला केला असण्याची शक्यता संरक्षणतज्ज्ञ वर्तवतात. असे स्नायपर हल्ले अगदी अचूक निशाणा साधून, उघड्यावर फिरणारा सेन्त्री, बंकर किंवा आड घेऊन बसलेल्या किंवा घात लावलेल्या जवानावर केल्या जातात. जैश आणि लश्करापाशी असलेल्या एम – ४ स्नायपर रायफलवर बसवलेल्या टेलिस्कोप आणि नाईट व्हिजन डीव्हाईसद्वारे ६-८०० मीटर्स अंतरावरील लक्ष्यावर रात्रीच्यावेळी देखील अगदी अचूक निशाणा साधता येतो.

सेना व इतर अर्ध सैनिकदलांनी स्नायपर हल्ल्यापासूनच्या बचावासाठी नवे सुरक्षा आयाम जरी केले आहेत. हे आयाम काय आहेत याची वाच्यता अजूनतरी झालेली नाही. पण कॅम्पजवळील कॉर्डन अँड सर्च ऑपरेशन्सच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. यापुढे सैनिकांना या स्नायपर्स आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती द्यावी लागेल. कॅम्प भोवतालच्या भिंतीची उंची वाढवावी लागेल आणि सेन्त्री पोस्टचे डिझाईन बदलाव लागेल.

एम-४ स्नायपर व एके ४७ या दोन्ही रायफल्समध्ये ‘लेड कव्हर्ड माईल्ड स्टील कोअर बुलेट’ वापरल्या जातात. सांप्रत काश्मिरमधील जिहादी हे अर्ध सैनिकदल व सेनेवर हल्ला करतांना बुलेटप्रुफ शिल्ड व बुलेटप्रुफ जॅकेटला भेदणार्‍य फुल स्टील कोअर बुलेट वापरतात. ३१ डिसेम्बर १७ रोजी लेथपुरामधील सीआरपीएफ कॅम्पवरील हल्ल्यात ही गोष्ट स्पष्ट झाली होती.

या मॉडिङ्गाईड बुलेट, एम ४ आणि एके ४७ या दोन्ही रायफलसमध्ये वापरल्या जातात. स्टील कोअर असल्यामुळे बुलेट प्रुफ जॅकेट घातलेले सैनिकही यापासून वाचू शकत नाही. ही बाब पुलवामात झालेल्या पोलीस मुख्यालयावरील जैश ए मोहम्मदच्या हल्ल्यात स्पष्ट झाली. स्नायपर व एके ४७ रायफल्सच्या बुलेटना चीनी तंत्रज्ञानाने ‘फुल स्टील कोटिंग’ करतात. ह्या बुलेट वापरण्यासाठी चीनी शास्त्रज्ञांना जैशच्या मारेकर्‍यासारखा खंदा बंदा मिळाल्यावर कट्टर जिहादी स्नायपर तयार व्हायला फारसा वेळ लागला नाही.

आज काश्मीरमध्ये जिहाद्यांची संख्या ७-८०००वरुन २००-२५०वर आली आहे. यावर्षी जुलैपर्यंत १३१ स्थानिक तरुण दह्शतवादाकडे वळले असून त्यात ३५ शोपियांचा समावेश असला तरी सध्या घुसखोरी कमी झाल्यामुळे जिहादी धड्यांना माणसांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे आत्मघातकी किंवा मोठ्या संख्येतील हल्ले करणे (मास अटॅक) जिहाद्यांना अशक्य झाले आहे. अशा वेळी कॅम्पवर मोठा हल्ला करून माणसे गमावणे जिहाद्यांसाठी आत्मघातकी लक्षण ठरेल. त्यामुळे माणसे न गमावता सुरक्षा दलांची जीवहानी करण्यासाठी ‘स्नायपर फायर’ हाच एकमेव पर्याय जिहाद्यांकडे उरला आहे. एलओसीवर मागील तीन चार वर्षांपासून स्नायपिंग सुरु झाले आहे. मुजाहीद्दिनांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी आयएसआय यापुढे स्नायपर्सचा उपयोग करेल यात शंकाच नाही. यापासून बचावासाठी सेनेला कंबर कसावी लागेल.