(लव्ह यू जिंदगी) उत्सव नात्यांचा…

0
173

कालिका बापट

आपल्या संस्कृतीत बालिका पूजन केले जाते. या मागचा हेतूच हा की मुलींचा आदर करणे. अशा आपल्या भारत देशात नात्यांचा उत्सव मनवला जातो, म्हणूनच आजही इथे माणुसकीचे नाते जपले जात आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने नाती जपणे ही केवढी आनंदाची गोष्ट आहे.

मना जाऊ माहेराला
भेटू भाऊ, भावजयांना
बाल्यातले क्षण आठवू
चल भेटू भाचरांना…
जरी नाही माय बाप
तिथे सुख गे अमाप
ओसरीत, अंगणात
दिसे बाल्यातले रूप…
काय सांगू तुला मना
काय दडले त्या तिथे
बालपण जे हरवले
तिथल्या मातीतच दिसे…
श्रावण घेऊनीया येतो
बीजे सौख्याची, हर्षाची
सुख आनंद पेरतो
जपे नाती माहेराची…

श्रावण मासाची चाहूल लागताच सासुरवाशिणीचे मन माहेराकडे वळते, मग ती नववधू असो किंवा मग अनेक वर्षे सासरी घालवलेली आजीबाई. प्रत्येक स्त्रीला माहेराचं कोड-कौतुक असतं. आईवडील हयात असतील तर सौख्याला, आनंदाला सीमा नसते. जाणत्या झालेल्या सासुरवाशिणीलाही माहेराची ओढ असतेच असते. कारण त्या तिथल्या माहेरच्या अंगणात तिचे बालपण हरवलेले असते. आणि मग भाचांच्या रूपाने का असेना, तिथल्या मातीत ते तिला दिसू लागतं.
माहेरची ओसरी, अंगण, तिथला कोपरान् कोपरा तिच्या आठवणींनी सुखावलेला असतो. म्हणूनच आईवडील हयात नसले तरी, भावजयांची उणी-दुणी ऐकावी लागली तरी ती माहेराकडे वळते. सुखाचे, आनंदाचे काही क्षण आपल्या ओंजळीत भरून घेण्यासाठी. अशा वेळी हा सखा श्रावण तिच्या आनंदात भर घालतो आणि निमित्त शोधून ती माहेराला जाते.
हा श्रावण मास नात्यांचा उत्सव घेऊन येतो, असे म्हणायला हरकत नाही. ओला आषाढ संपतो न संपतो, सर्वांना श्रावणाचे वेध लागतात. महिलांना हा श्रावण मास प्रिय तर आहेच. भगवंताच्या भक्ती रसात तल्लीन होऊन नाचणार्‍या भजन वारकर्‍यांनाही श्रावण नादावून सोडतो. महिलावर्ग तर शिवामूठ, मंगळागौरी, आदित्यपूजन इत्यादी व्रतवैकल्यांमध्ये गुंतलेल्या असतात. नोकरी करणारी महिला असो किंवा ग्रामीण महिला, आपल्या जोडीदाराच्या उज्ज्वल आयुष्यासाठी आणि भविष्यासाठी ती व्रतवैकल्ये करीत असते.
श्रावणातील सारेच सण हे नात्यांचे बंध जोडणारे आहेत. माणुसकीचा, भाऊबंदकीचा संदेश देणारे हे सण निसर्ग संवर्धनाचाही संदेश देतात. शेतकर्‍यांचा सखा म्हणून ओळखल्या जाणार्‍या सरपटणार्‍या प्राण्यांची अर्थात नाग सर्पांची नागपंचमीला पूजा केली जाते. निसर्गाचा महत्वाचा घटक म्हणून ओळखल्या जाणार्‍या या सर्पांची पूजा करून त्यांचे अस्तित्व कायम टिकविण्याची ही परंपरा. त्यानंतर नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी इत्यादी सण आनंदाचे उधाण घेऊन येतात.
आपण आईची थोरवी गीत-कवितांमध्ये ऐकतच असतो. परंतु वडलांच्या प्रेमाची साक्ष देणारा खरा सण म्हणजे गोकुळाष्टमी. यमुनेला पूर आला असताना केवळ आपल्या अपत्य प्रेमासाठी राजा वासुदेव कृष्णाला घेऊन गोकुळात गेला. कंसापासून आपल्या अपत्याला वाचवण्याचा हा खटाटोप म्हणजे वडिलांच्या मुलांविषयीचे प्रेम होय. यमुनेच्या पाण्यातून वाट काढीत गोकुळाकडे जाणार्‍या वासुदेवाची आपण किती आठवण काढतो? आपलेही वडील असेच वासुदेवासारखे आपल्यावर प्रेम करतात, याचे भान किती जणांना आहे? आपण कृष्णजन्म साजरा करतो, गोकुळाष्टमीला दहीहंडी फोडतो. परंतु कृष्णाला ज्यांनी सुखरूपपणे गोकुळात पोचविले त्यांना तर विसरून जातो. अशा या कृष्ण जन्माच्या, गोकुळाष्टमीच्या सणा निमित्ताने आपण आपल्या वडिलांच्या प्रेमाची जाणीव ठेवली पाहिजे.
श्रावणातला आठवणीत ठेवला जाणारा सण म्हणजे, नारळी पुनव, रक्षाबंधन. दर्यावर व्यवसाय करणारे कोळी या दिवशी समुद्र देवतेची पूजा करून, येणारे वर्ष सुखी जावो अशी प्रार्थना करतात. आपल्या पूर्वजांनी अशा हेतू पुरस्सर सणांची आखणी आणि मांडणी करून माणुसकीचा, भाऊबंदकीचा संदेश देण्याचे उद्दिष्ट सफल केले आहे. म्हणूनच अशा सण उत्सवांची योजना अखंड शाबूत आहे.
रक्षाबंधनाचा हा असा सण आहे, जिथे भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव मनवला जातो.
जरी सध्या या सणाला व्यावसायिक रूप आले असले तरी या सणाचा मूळ उद्देश सफल होत असतो. भेटी, तोहफे एकमेकांना देणे ही केवळ औपचारिकता असते, जिचे आपल्या ऐपतीप्रमाणे आदान-प्रदान केले जाते. मुळात बहीण-भावाचे नाते अखंड दृढ रहावे, हा या सणामागचा प्रांजळ हेतू आणि उद्देश. नाहीतर बघा ना, प्रत्येकाला अनुभव असेल. महिला किती कोडकौतुकाने वर्षभर या सणाची वाट पाहत असतात आणि जर का या सणामागे स्वार्थ असेल, तर मग ते नाते टिकत नाही. मग तो केवळ व्यवहारच ठरतो. म्हणून आनंदाची ओंजळ भरून घेताना काही तत्त्वेही सांभाळावी लागतात. जेणेकरून नात्यांचा सन्मानही होतो आणि ती नाती अखंडपणे टिकून राहतात.
श्रावणात खर्‍या अर्थाने सण साजरे केले जातात ते माणुसकी आणि माणूसपण टिकविण्यासाठी. एरवी वर्षभर आपण आपल्या व्यापात असतो. परंतु पावसाची चाहूल लागली रे लागली की आपल्याला श्रावणाचे वेध लागतात. पुरुष सहसा आपल्या भावना उत्कटपणे व्यक्त करत नाही. अशा वेळी या सण उत्सवांच्या माध्यमातून महिलाच नात्यांची जपणूक करतात. बहिणीच्या साध्या सोप्या वागण्यातच भावाविषयीचे प्रेम दिसते. परंतु भाऊ सहसा भावना स्पष्टपणे व्यक्त करताना दिसत नाही. परंतु बहिणी विषयीचा आदर त्याला नक्कीच असतो.
आपल्या संस्कृतीत बालिका पूजन केले जाते. या मागचा हेतूच हा की मुलींचा आदर करणे. अशा आपल्या भारत देशात नात्यांचा उत्सव मनवला जातो, म्हणूनच आजही इथे माणुसकीचे नाते जपले जात आहे. सण उत्सवाच्या निमित्ताने नाती जपणे ही केवढी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळेच सासुरवाशिणीला माहेराची ओढ असते. आणि मग तिच्या मुखावाटे शब्द निघतात….
श्रावणातल्या रेशीमसरींनो
माहेरी जाऊन या हो
त्या तिथल्या आठवणी
माझ्या दारी बरसा हो..!