लवू मामलेदार यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब

0
206

>> दीपक ढवळीकर यांची पत्रपरिषदेत माहिती

येथील गोमंतक मराठा समाज संस्थेच्या सभागृहात मगोपच्या काल घेण्यात आलेल्या आमसभेत मगोपचे सरचिटणीस तथा माजी आमदार लवू मामलेदार यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टीला मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

मगोपच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक घेण्यात आली. मगोपची १९९८ नंतर प्रथमच केंद्रीय समिती निवडण्यासाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे पॅनल विजयी झाले. रविवारी घेण्यात आलेल्या मगोपच्या आमसभेत पक्षीय निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. या आमसभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पक्षविरोधी कारवाया करीत असल्याचा ठपका ठेवून पक्षाचे सरचिटणीस, माजी आमदार लवू मामलेदार यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. या निर्णयाला मगोपच्या आमसभेची मान्यता घेण्यात आलेली नाही. रविवारच्या आमसभेत मामलेदार यांच्या हकालपट्टीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मगोपची शिस्तपालन समिती निवडण्यात आली आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.

पालिका निवडणूक लढवणार
मगोप राज्यातील नगरपालिका निवडणूक लढविणार आहे. स्थानिक गट समित्यांना निवडणूक लढविण्यासाठी तयारी करण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी शेतकर्‍यांना लागवडीसाठी दिलेल्या जमिनीचा मालकी हक्क शेतकर्‍यांना दिला पाहिजे. राज्यातील शेतकर्‍यांना जमिनीचा मालकी हक्क मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मगोप शेतकर्‍यांना जमिनीचा मालकी हक्क मिळवून देण्यासाठी प्राधान्य देणार आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांची ध्येये आणि धोरणांचा पाठपुरावा केला जाणार आहे, असे माजी उपमुख्यमंत्री, मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.