भारताची मुष्टियोद्धी लवलिना बोर्गोहेनने महिलांच्या ६९ किलो गटात कांस्य पदक पटकावले. टोकियो ऑलिम्पिकमधील हे भारताचे तिसरे पदक ठरले आहे. उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेलीकडून लवलिनला पराभव पत्करावा लागला.
भारताच्या लवलिनाने उपांत्य फेरीत प्रवेश करून लढती आधी देशासाठी एक पदक निश्चित केले होते. काल ४ ऑगस्ट रोजी झालेल्या लढतीत सुरमेनेलीने तिचा ५-० असा पराभव केला.
ऑलिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे बॉक्सिंगमधील तिसरे पदक आहे. याआधी २००८ मध्ये विजेंदर सिंगने तर मेरी कोमने २०१२ मध्ये कास्य पदक जिंकले होते. त्यानंतर ९ वर्षांनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळाले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवलिना हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी कांस्य पदक मिळवल्याबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.
रविकुमार दहिया अंतिम फेरीत
भारताचा कुस्तीपटू रवीकुमार दहियाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतासाठी त्याच्याकडून एक पदक निश्चित झाले आहे. रवी कुमारने ५७ किलो वजनी गटात कझाकिस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. रवी कुमारने बुल्गारियाच्या जॉर्जी वालेंटिनो वांगेलोव याचा टेक्निकल सुपिरियोरिटीने पराभव करून उपांत्य फेरीत जागा निश्चित केली होती.