>> मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती; ‘विमा सखी’ची अंमलबजावणी करणारे गोवा देशातील दुसरे राज्य
राज्यातील 1 हजार महिलांची लवकरच ‘विमा सखी आयुर्विमा प्रतिनिधी’ म्हणून नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. दोनापावला येथे काबो राजभवन परिसरातील दरबार सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा केली. ह्या उपक्रमाद्वारे राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
‘विमा सखी’ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर या महिलांना दरमहा सात हजार रुपये सेवा वेतन (स्टायपेंड) देण्यात येणार आहे. तसेच वर्षाला 24 विमा पॉलिसी केल्यास 48 हजार रुपये बोनस देण्यात येणार आहे. केंद्र सरकारचा हा उपक्रम गेल्या 17 डिसेंबर रोजी हरयाणा राज्यात सुरू करण्यात आलेला असून, आता तो उपक्रम सुरू करणारे गोवा हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विमा सखी बनू इच्छिणाऱ्या महिलांना सरकार त्यासाठीचे आवश्यक ते सगळे प्रशिक्षण देणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची परीक्षा घेण्यात येणार असून, प्रमाणपत्र देऊन त्यांची ‘विमा सखी’ म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. ‘विमा सखी’ बनण्यासाठी दहावी ही शैक्षणिक पात्रता असेल. तसेच यशस्वी विमा सखी बनण्यासाठी त्यांना उत्तमरित्या संवाद साधण्याची कला आत्मसात करावी लागणार आहे. राज्यातील महिलांनी ‘विमा सखी’ बनण्याची संधी सोडू नये. या क्षेत्रात महिलांना करिअरसाठी चांगला वाव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. महिलांनी आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी या योजनेचा लाभ घ्यावा आणि अशा प्रकारे सरकारचे स्वयंपूर्ण गोवा अभियान पूर्ण करण्यास मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
एलआयसी गोवा विभागाच्या वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक संगीता परब यांनी आपल्या भाषणात या योजनेविषयी अधिक माहिती दिली. विमा सखी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर महिला पूर्णवेळ किंवा अर्धवेळ काम करू शकतात. पहिल्या वर्षासाठी दरमहा रुपये 7 हजार वेतन आणि पुढील दोन वर्षांसाठी 6 हजार आणि 5 हजार रूपये कमवू शकतात, असे त्या म्हणाल्या.
नियोजन सांख्यिकी व मूल्यमापन संचालनालयाने आयुर्विमा महामंडळाच्या सहकार्याने आयोजित नोंदणी मोहिमेला राज्यभरातील विविध बचत गटांतील सुमारे एक हजार महिलांनी सहभाग घेतला. यावेळी काही महिलांना ‘विमा सखी’ म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली. यावेळी दक्षिण गोवा डीआरडीएच्या संचालिका दीपाली नाईक, उत्तर गोवा डीआरडीएचे गोपाळ पार्सेकर, डीपीएसईचे संचालक विजय सक्सेना, एलआयसी व डीआरडीएचे कर्मचारी उपस्थित होते.