लवकरच सर्व ठीक होईल : पंतप्रधान

0
121
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेनजीकच्या गावात पाक सैन्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाला उपचारासाठी नेण्यात येत असताना.

पाक सैन्याला चोख उत्तर देण्याचे आदेश

पाक सैन्याच्या हल्ल्यात २ भारतीय ठार

पाकिस्तानी सैन्याकडून गेल्या आठवड्याभरात शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन होण्यासह त्यात निर्दोष भारतीय नागरिकांचेही बळी जात असल्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे हवाई दलाच्या एका कार्यक्रमावेळी सूचक वक्तव्य केले. पाक सैन्याच्या आगळीकी वाढल्याचे प्रसारमाध्यमांनी लक्षात आणून दिले असता मोदी यांनी लवकरच सर्व ठिक होईल अशी मोघम टिप्पणी केली.हवाईदल स्थापनेच्या वर्धापन सोहळ्यावेळी मोदी यांनी हवाई दलप्रमुख एअर मार्शल अरुप साहा यांच्या उपस्थितीत वरील वक्तव्य केले. मात्र त्यांनी यावर अधिक विवेचन केले नाही. मात्र त्यावरून आता मोदी सरकारने पाक सैन्याच्या बंदुका व तोफांचा आवाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. पाकिस्तानकडून होणारे भारतीय सैन्य व नागरी वस्त्यांवरील हल्ले थांबेपर्यंत चोख प्रत्त्युत्तर देण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. या संदर्भातील रणनीतीचे स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानुसार भारतीय सैन्य तसेच सीमा सुरक्षा दल यांनी काम सुरू केले असल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांबरोबर ध्वज बैठका न घेण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
दरम्यान भारत-पाक सीमेवरील ताज्या घडामोंडीबद्दल अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. उभयतांनी चर्चेतून मार्ग काढावा असे अमेरिकेच्या विदेश विभागाचे प्रवक्ते जेन साकी यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेनेही उभयतांना संयमाचे आवाहन केले आहे.
भारतीय नागरी वस्त्यांवर हल्ले सुरूच
पाक सैनिकांच्या गोळीबारात दोन महिला ठार
जम्मू : जम्मू-काश्मिरमधील आंतरराष्ट्रीय सीमेलगत पाकिस्तानी सैनिकांचे नागरी वस्त्यांवरील गोळीबारात खंड पडलेला नसून काल अशाच एका हल्ल्यात एकाच कुटुंबातील दोन महिला ठार झाल्या. तसेच अन्य १५ जण जखमी झाले आहेत. यामुळे गेल्या आठवड्याभरातील पाक सैन्याकडून झालेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांची संख्या आठ झाली आहे. तर जखमींची संख्या ७० झाली आहे.
पाक सैन्याच्या या आगळीकीमुळे भारतीय सीमेलगतच्या खेड्यांमधील सुमारे १६ हजार लोकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. पाकिस्तानी सैनिकांनी काल सांबा जिल्ह्याच्या चिल्लारी खेड्याला आपले लक्ष्य केले. सकाळी ७.३० वा. च्या दरम्यानच्या या गोळीबारात शकुंतला देवी व तिची सून अशा दोन महिला ठार झाल्या. तसेच तिचा पती व दोन लहान मुले जखमी झाली अशी माहिती सांबा जिल्ह्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अनिल मंगोत्रा यांनी दिली. त्यानंतर या खेड्यातील सुमारे १७०० लोक अन्य सुरक्षित स्थळी रवाना झाले. या घटनेनंतर ९ वा. सीमेलगतच्या जोर्डा येथे पाक सैनिकांनी गोळीबार केला. त्यात सहाजण जखमी झाले.