>> ऑस्ट्रेलिया ४ बाद २४८
मार्नस लबुशेनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध पर्थमध्ये खेळविण्यात येत असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ४ गडी गमावत २४८ अशी धावसंख्या उभारली आहे.
ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवशी दमदार सुरुवात करून देण्यात मार्नस लबुशेन १४ चौकार व १ षट्कारांसह २०२ चेंडूत ११० धावांवर नाबाद खेळत आहे. युवा लबुशेनचे हे सलग तिसरे शतक होय. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात लबुशेनने दोन शतके नोंदविली होती. तर त्यानंतर आजचे हे त्याचे तिसरे शतक होय. जो बर्न्स (९) आणि डेव्हिड वॉर्नर (४३) हे दोघे तंबूत परतल्यानंतर २ बाद ७५ अशा स्थितीतून संघाचा डाव सावरताना लबुशेनने स्टीव्ह स्मिथच्या (४३) साथीत तिसर्या विकेटसाठी १३२ धावा जोडल्या. मॅथ्यू वेड १२ धावा जोडून परतला. त्यानंतर लबुशेन आणि टे्रव्हिस हेड (नाबाद २०) यांनी दिवसअखेरपर्यंत आणखी गडी बाद होऊ दिले नाहीत. न्यूझीलंडकडून नील वॅग्नरने २ तर टिम साउदी व कॉलिन डी ग्रँडहोम यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.