लगे रहो केजरीवाल!

0
35

‘अच्छे बीते पाच साल, लगे रहो केजरीवाल’ असे एक गाणे विशाल दादलानीने केजरीवाल आणि त्यांच्या ‘आप’ साठी एकेकाळी बनवले होते. गोव्यामध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पर्यटना अंतर्गत आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल गोवा भेटीवर नुकतेच येऊन गेले. सध्या गोव्यामध्ये विविध राजकीय पक्षांची भाऊगर्दी झालेली आहे. त्यामधून आपले स्थान निर्माण करणे हे सोपे नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीतही आम आदमी पक्षाने गोव्यात उतरून हात पोळून घेतले होते. मात्र, तेव्हा त्या पक्षाभोवती काही मूठभर बुद्धिवादी आणि एनजीओंचा गराडा होता. यावेळी केजरीवाल आणि त्यांचा पक्ष अधिक व्यापक लोकसंख्येपर्यंत या ना त्या निमित्ताने पोचलेला आहे. विशेषतः कोरोनाकाळामध्ये त्यांनी लोकांना केलेली मदत, धान्यवाटप आदींद्वारे ‘आप’ आणि ‘केजरीवाल’ हे नाव आतापावेतो घरोघरी पोहोचले आहे ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही, मात्र, काही महिन्यांपूर्वी केजरीवालांच्या गोवाभर लागलेल्या भित्तिपत्रांनी ज्या प्रकारचे वातावरण निर्माण केलेले होते, ते तृणमूल कॉंग्रेसच्या आगमनानंतरच्या घडामोडींत विरून गेल्याचे दिसते आहे.
मुळामध्ये गोव्यामध्ये सत्ताधारी भाजपला पर्याय म्हणून जे स्थान आहे ते पटकावण्यासाठी सर्व विरोधकांमध्येच अहमहमिका लागलेली दिसते. एकत्र येण्याऐवजी त्यासाठी एकमेकांच्या उरावर बसायलाही ते तयार झालेले दिसतात. तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी गोव्यात येतात आणि राहुल गांधी आणि केजरीवालांना लक्ष्य करतात. कॉंग्रेसच्या अलका लांबा येतात आणि ‘आप’ ला टीकेचे लक्ष्य करतात, ‘आप’ तृणमूलला भाजपची बी टीम ठरवतो, हा जो काही एकमेकांना लाथाळ्या घालण्याचा प्रकार चाललेला आहे, तो अंतिमतः सत्ताधारी भाजपच्या पथ्थ्यावर पडणारा आहे.
केजरीवालांनी काही काळापूर्वी गोव्यातील निवडणुकीची खेळपट्टी आपल्याला हवी तशी तयार करून घेण्यास प्रारंभ केला. त्यांनी गोवेकरांना मोफत विजेचे आश्वासन दिले. लागोपाठ भाजप सरकारला मोफत पाण्याचे आश्वासन द्यावे लागले. केजरीवालांनी रोजगार भत्ता देऊ केला, भाजपने दहा हजार नोकर्‍यांचे आश्वासन दिले, केजरीवालांनी तीर्थयात्रेची बात केली, लगोलग भाजप सरकारने ज्येष्ठांना देवदर्शन घडविण्याची योजना बनवली. म्हणजेच येत्या निवडणुकीचा आखाडा आम आदमी पक्ष स्वतःला हवा तसा बनवत चालला होता आणि त्यामध्ये भाजप सरकार फरफटत ओढले जात राहिले होते. विजेच्या विषयावर झालेली जाहीर चर्चा हाही त्यातलाच सवंग प्रकार होता. ही जी धास्ती सत्ताधार्‍यांच्या मनामध्ये ‘आप’ ने काही काळापूर्वी निर्माण केली होती ती आज विविध राजकीय पक्षांच्या अतिबुजबुजाटामुळे उरलेली नाही.
राज्यात भाजपला पर्याय म्हणून जो तो स्वतःला पुढे करीत असला तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही, उलट एकमेकांच्या उरावर चढायलाच ते मैदानात उतरले आहेत हेच आतापावेतो दिसू लागले आहे. ज्या कॉंग्रेसची या एकत्रीकरणात महत्त्वाची भूमिका असायला हवी, त्याचा अजून निर्णयच होत नाही. अशा परिस्थितीत राज्यात झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या भाऊगर्दीत ‘आप’ येत्या निवडणुकीत आपले राजकीय अस्तित्व दाखवू शकेल? पक्षाच्या आजवरच्या प्रचार मोहिमेमध्ये तर ‘सब कुछ केजरीवाल’ असेच चित्र आहे. आपले सरकार आले तर भावी मुख्यमंत्री कोण ह्या प्रश्नाचे उत्तरही त्यांच्यापाशी नाही.
ज्या ‘वेगळेपणा’ चा वायदा करीत आम आदमी पक्ष राजकारणात आला ते आज त्या पक्षामध्ये कुठे दिसते? काही प्रसारमाध्यमांशी साटेलोटे केले, सोशल मीडियावरून धुमाकूळ घातला, मतदारांना धान्य वाटले आणि प्रचंड पत्रकबाजी केली की मतदार आपल्याकडे आकृष्ट होईल आणि दिल्लीप्रमाणे एकगठ्ठा आमदार निवडून देईल, अशा दिवास्वप्नात जर केजरीवाल आणि त्यांचा पक्ष दंग झालेला असेल तर त्यांना गोव्याचे जनमानस कळलेलेच नाही असेच म्हणावे लागेल. ‘मै भी अन्ना, तू भी अन्ना’ करीत अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्मलेला, परंतु अण्णांनाच टांग देऊन राजकीय पक्ष बनलेला ‘आप’ ज्या व्यवस्था परिवर्तनाची बात करीत होता ती कुठे आहे? ‘लगे रहो केजरीवाल’ हे खरे, परंतु मतदारांना सवंग आमिषे दाखवायची, प्रचंड जाहिरातबाजी करून भ्रामक जनमत निर्माण करायचे आणि या हल्ल्यागुल्ल्याच्या बळावर निवडणुकीत सत्तेवर यायचे हेच तंत्र जर ‘आप’ही गोव्यात अवलंबिणार असेल तर त्याचे वेगळेपण राहिले कुठे? जनतेने त्यांच्यामागे का जावे हे केजरीवाल सांगतील काय?