लखनऊमध्ये चार बहिणींसह आईची हत्या

0
5

>> मुलाला अटक, तर वडील फरार; कौटुंबिक वादातून घडला प्रकार

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लखनऊ शहर हत्याकांडाने हादरले. उत्तर प्रदेशच्या लखनऊ शहरातील एका हॉटेलमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. त्यामध्ये 4 बहिणी आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. या प्रकरणात पोलिसांनी 24 वर्षीय मुलाला अटक केली असून, वडील फरार आहेत. दरम्यान, कौटुंबिक वादातून या पाच जणांची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव अर्शद असे आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका कुटुंबातील पाच सदस्य बुधवारी लखनऊ शहरातील नाका परिसरात असणाऱ्या एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. या मृतांमध्ये 49 वर्षीय एक महिला आणि तिच्या चार मुलींचा समावेश आहे. या महिलेचे नाव अस्मान असे आहे, तर अलिशिया (19), रहमीन (18), अक्ष (16 )आणि आलिया (9) असे या घटनेतील चार मुलींची नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी अस्मानचा मुलगा अर्शद (24) याला अटक केली. तसेच ही हत्या मुलगा अर्शदने कौटुंबिक वादातून केली असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात त्याच्या वडिलांचाही सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण ही घटना घडल्यानंतर अर्शदचे वडील फरार झाले आहेत. त्यामुळे त्यांचा शोध सुरू आहे.

नागपुरात मुलाकडून आई-वडिलांची हत्या
नागपूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली. मुलाने स्वतःच्या आई-वडिलांचीच निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर त्याने पोलीस आणि नातेवाईकांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माय-बापाची हत्या नाही, तर आत्महत्या असल्याचा बनावही रचण्याचा प्रयत्न त्याने केला. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने हत्येची कबुली दिली आहे. ही घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या खसाळा परिसरात घडली. लिलाधर डाखोळे आणि अरुणा डाखोळे असे आईवडिलांचे नाव असून आरोपी मुलाचे नाव उत्कर्ष डाखोळे आहे. उत्कर्षचे वडील खापरखेडे येथे महाजेनकोमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतात, तर आई एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. मात्र वारंवार नापास होत असल्याने उत्कर्षच्या कानशिलात लगावली होती. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम होता.