>> केंद्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार राज्य सरकारचा प्रस्ताव
सध्या तरी आणखी लॉकडाऊनचा विचार नसल्याचे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून बोलताना स्पष्ट केले. तसेच लक्षण विरहित रुग्णांना घरीच क्वारंटाइन करण्याबाबत राज्य सरकारचा प्रस्ताव असून केंद्रीय मार्गदर्शक तत्वांनुसार तो अमलात आणला जाईल, असे ते म्हणाले.
कोरोनाचा संसर्ग झालेल्या मात्र त्यासंबंधीची कोणतीही लक्षणे व दिसणार्या रुग्णांना होम क्वारंटाइन ही सुविधा पुरविली जाईल. मात्र, त्यासाठी त्यांना उपजिल्हाधिकार्यांकडे तसा रितसर अर्ज करावा लागेल, असे सावंत यांनी स्पष्ट केले. एखाद्या कुटुंबातील एका व्यक्तीला जर कोरोनाचा संसर्ग झाला व त्याच्यात रोगाची लक्षणे नसतील व त्याच्या घरात त्याला विलगीकरणात राहण्यासाठी स्वतंत्र खोली असेल तर अशा रुग्ण व्यक्तीला यापुढे होम क्वारंटाइनचा पर्याय देण्यात येणार आहे. गोव्यात आतापर्यंत हा पर्याय उपलब्ध नव्हता. आता आम्ही तो पर्याय देण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त अथवा सर्वच सदस्यांना संसर्ग झालेला असेल व त्याच्यात रोगाची लक्षणे दिसत नसतील तर ते सर्व जण एका घरात राहू शकतील, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. केंद्रीय गृह व्यवहार मंत्रालय व आयसीएमआयच्या मार्गदर्शक तत्वानुसार अशा रुग्णांना होम क्वारंटाइनमध्ये राहता येते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
अन्य राज्यातून गोव्यात येणार्या लोकांची गुरुवारपासून चाचणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत परराज्यांतून येणार्या लोकांचे कोरोनाची चाचणी करण्यासाठी नमुने गोळा करण्यात येत होते व त्यांना अहवाल मिळेपर्यंत विलगीकरणात रहावे लागत होते. तर जे चाचणी करुन घेत नसत त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइमध्ये रहावे लागत असे.
गंभीर आजार असलेल्यांनी दक्षता घ्या
आतापर्यंत राज्यात जेवढ्या कोरोना रुग्णांचे निधन झाले आहे त्यापैकी बर्याच जणांना गंभीर स्वरुपाचे आजार होते व त्यामुळेच त्यांचे निधन झाल्याचे सांगून गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या लोकांनी आपणाला कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे सावंत म्हणाले. त्यांच्या कुटुंबीयांनीही त्यासाठी काळजी घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी इमारतीत प्रवेशासाठी स्मार्टफोनवर आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याची नागरिकांना कोणतीही सक्ती नसल्याचे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्लाझ्मा दान करण्याचे आवाहन
कोरोना संसर्गातून बरे झालेल्या धडधाकट लोकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे यावे. प्लाझ्मा दान अत्यंत सुरक्षित असून त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी प्लाझ्मा दान करावे, असे आवाहन सावंत यांनी केले.
नाईट कर्फ्युमुळे वाहतूक कमी
नाईट कर्फ्युमुळे राज्यातील वाहतूक कमी होऊन ती रात्रीच्या वेळी २० टक्क्यांवर आली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
शाळांबाबत अद्याप निर्णय नाही
राज्यातील विद्यालये कधी सुरु करण्यात येतील, असे पत्रकारांनी विचारले असता त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले.
कोविडसाठीच्या साहित्य खरेदीस मान्यता
दरम्यान, काल मंत्रिमंडळ बैठकीत कोविडसाठीच्या साहित्य खरेदीस मान्यता देण्याचा निर्णय झाला. सुमारे ६० लाख रु. चे साहित्य खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यात कोविडसाठी लागणारे किट व मास्क आदींचा समावेश असल्याचे ते म्हणाले.
परिचारिका व लॅब टेक्निशियन्सच्या भरतीस मान्यता
मंत्रिमंडळ बैठकीत कोविड इस्पितळात काम करण्यासाठी ३० परिचारिका (नर्सेस) व १० स्वॅब टेक्निशियन्सच्या भरतीस मान्यता देण्यात आली.
कला महाविद्यालयाचे प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांना एका वर्षासाठीची सेवावाढ देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत झाला.