ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. संदीप असे या युवकाचे नाव आहे. हत्येच्या घटनेनंतर त्याने सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टच्या आधारावर त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. लंकेश हत्या प्रकरणाचा तपास विशेष चौकशी पथकामार्फत करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल वरील आदेश दिला. दरम्यान, या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा, अशी मागणी लंकेश यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. सीबीआयच्या तपासात सत्य बाहेर येईल, असे लंकेश यांचे बंधू इंद्रजित यांनी म्हटले आहे. लंकेश यांच्यावर काल शोकाकूल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांच्यासह अनेक मान्यवरांनी लंकेश यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.