लंकेची न्यूझीलंडवर ६ गड्यांनी मात

0
118

>> दिमुथ करुणारत्ने – लाहिरु थिरिमानेची १६१ धावांची सलामी

श्रीलंकेने २६८ धावांचा यशस्वी पाठलाग करताना काल रविवारी न्यूझीलंडचा ६ गड्यांनी पराभव केला. या विजयासह त्यांनी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपल्या शुभारंभी लढतीत पूर्ण ६० गुणांची कमाई केली.

दिमुथ करुणारत्ने याने कर्णधार या नात्याने विजयाचा रेकॉर्ड कायम राखत संघाला सलग तिसरा विजय मिळवून दिला. करुणारत्ने याने आपल्या २३ डावांतील पहिले व एकूण नववे कसोटी शतक ठोकताना १२२ धावांची खेळी करत संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्याने आपल्या खेळीत केवळ ६ चौकार व १ षटकार लगावला.
खेळाडू म्हणून संघातील जागा धोक्यात असलेल्या लाहिरु थिरिमाने याने खेळपट्टीवर नांगर टाकताना १६३ चेंडूंत ६४ धावा जमवताना पुढील कसोटीसाठी आपली संघातील जागा पक्की केली. बेजबाबदार फटका खेळून बाद होण्याची परंपरा मोडीत काढताना त्याने संयमाच्या महामेरूचे दर्शन घडवले. चौथ्या व पाचव्या दिवसाच्या खेळात फलंदाजी करणे अवघड असताना या द्वयीने पहिल्या गड्यासाठी १६१ धावांची भागीदारी रचली. सॉमरविलचा चेंडू स्वीप करण्याच्या प्रयत्नात थिरिमाने पायचीत झाला. मैदानी पंचांनी अपील फेटाळल्यानंतर न्यूझीलंडने रिव्ह्यूचा वापर करत थिरिमानेला तंबूचा रस्ता दाखवला.

पहिल्या डावातील अर्धतकवीर कुशल मेंडीसने तिसर्‍या स्थानावर फलंदाजीस येत चौकार व षटकार ठोकत धाडस दाखवले. परंतु, खेळपट्टीवर टिकून राहण्याचा संयम त्याच्यात दिसला नाही. पुन्हा एकदा आक्रमक फटका खेळण्याच्या नादात थेट मिडविकेटवर उभ्या असलेल्या जीत रावलकडे झेल देत कुशल मेंडीस परतला.
कुशलचे अल्प मनोरंजन संपल्यानंतर अँजेलो मॅथ्यूजने पुन्हा लंकेच्या डावाला स्थिरता आणली. परिस्थिती ओळखून त्याने खेळ दाखवताना आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला. श्रीलंकेला विजयासाठी पन्नास धावांची आवश्यकता असताना करुणारत्ने बाद झाला. लक्ष्य अवाक्यात आल्याने कुशल परेराने फटकेबाजी करत १९ चेंडूंत २३ धावा जमवल्या. बोल्टने त्याला बाद केल्यानंतर धनंजय डीसिल्वाने मॅथ्यूजसह विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील २४९ धावांना उत्तर देताना श्रीलंकेने २६७ धावांपर्यंत मजल मारली होती. न्यूझीलंडने दुसर्‍या डावात २८५ धावा केल्या होत्या. मालिकेतील दुसरा कसोटी सामना कोलंबो येथे २२ ऑगस्टपासून खेळविला जाणार आहे. पहिल्या कसोटीत खेळपट्टीकडून मदत मिळत असतानादेखील फिरकीपटूंना अपेक्षित यश न मिळाल्यामुळे न्यूझीलंडच्या चिंतेत भर पडली आहे. केवळ चार दिवसांत दुसर्‍या कसोटीला प्रारंभ होत असल्यामुळे आपल्या संघाच्या रचनेचादेखील त्यांना पुनर्विचार करावा लागणार आहे.

धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद २४९
श्रीलंका पहिला डाव ः सर्वबाद २६७
न्यूझीलंड दुसरा डाव ः सर्वबाद २८५
श्रीलंका दुसरा डाव ः दिमुथ करुणारत्ने झे. वॉटलिंग गो. साऊथी १२२, लाहिरु थिरिमाने पायचीत गो. सॉमरविल ६४, कुशल मेंडीस झे. रावल गो. पटेल १०, अँजेलो मॅथ्यूज नाबाद २८, कुशल परेरा झे. सेंटनर गो. बोल्ट २३, धनंजय डीसिल्वा नाबाद १४, अवांतर ७, एकूण ८६.१ षटकांत ४ बाद २६८
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट ९.१-१-३४-१, टिम साऊथी