गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान
स्वातंत्र्य सैनिक तथा लेखक, पत्रकार लँबर्ट मास्कारेन्हस चारित्र्याचे पूजक होते. राष्ट्रवादी विचार जनतेच्या मनात रुजविण्यासाठी त्यांनी सातत्याने आपल्या लेखणीचा वापर केला, असे सांगून मास्कारेन्हस यांचा गौरव म्हणजे गोमंतकीयांचा गौरव असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार मास्कारेन्हस यांना गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान केल्यानंतर मुख्यमंत्री कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
गोवा उशिरा मुक्त झाला. देशाच्या नेत्यांनी कच खाल्ल्यामुळेच गोवा भारतापासून अनेक वर्षे दूर राहिला. मास्कारेन्हस यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या प्रयत्नामुळेच अखेर गोवा मुक्त झाल्याचे पर्रीकर म्हणाले. कचखाऊ मानसिकतेला छेद देण्याचे काम लँबर्ट यांच्या सारख्यांनी केल्याचे ते म्हणाले.
मास्कारेन्हस यांनी भारतीयत्व ही आपली खरी अस्मिता, खरी ओळख आहे, असा संदेश आपल्या लेखनातून लँबर्ट यांनी दिला. काही लोकांसमोर अस्मितेच्या बाबतीत गोंधळ आहे. त्यांनी मास्कारेन्हस यांच्या लेखनाकडे, त्यांच्या संदेशाकडे पहावे, असे सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले.
विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी मास्कारेन्हस अजूनही सक्रिय असल्याचे सांगितले. आपल्या वडिलांच्या शंभराव्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येवर गोवा सरकारने गोमंत विभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केल्याबद्दल त्यांच्या कन्या नयनतारा लैतांव यांनी वडिलांच्यावतीने भावना व्यक्त केल्या. संस्कृतीमंत्री दयानंद मांद्रेकर यांचेही भाषण झाले.
मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या हस्ते मास्कारेन्हस यांना ५ लाख रु. रोख, प्रमाणपत्र व समई या स्वरुपात गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिव बी. विजयन यांनी स्वागत केले.