चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रात्र होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्त्रो) पाठवण्यात आलेल्या चांद्रयान २चे लँडर विक्रम चंद्र भूमीवर आहे. चंद्रावर रात्र होण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक आहे. चंद्रावर पुढील १४ दिवस रात्र सुरू होणार असून त्यामुळे विक्रमशी संपर्क करणे ही अशक्य गोष्ट आहे. या कालावधीत विक्रम लँडरचा फोटोदेखील काढता येणार नाही. चंद्राच्या ज्या भागावर विक्रम आहे तेथे असलेल्या प्रचंड काळोखामुळे कोणतीही गोष्ट पाहता येत नाही. तसेच तेथील तापमान वजा १८३ डिग्री सेल्सियस इतके असेल. त्यामुळे विक्रम सुरक्षित राहील का याही बाबत शंका आहे. इतक्या कमी तापमानात विक्रममधील अनेक इलेक्ट्रॉनिक यंत्रणा खराब होऊ शकतात. या सर्व परिस्थितीमुळेच लँडर विक्रमशी पुन्हा संपर्क करण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत.
दरम्यान, भारताचा चंद्रावर उतरण्याचा ज्या भागात प्रयत्न केला, त्या भागाची नासाच्या मून ऑर्बिटरने छायाचित्रे टिपली असल्याचे अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेतील एका प्रकल्प शास्त्रज्ञाच्या हवाल्याने एका माध्यमाने म्हटले आहे.