रोहनचा फेरविचार

0
49

अपक्ष आमदार रोहन खंवटे यांचे कॉंग्रेसवासी झालेले समर्थक त्यांच्याच इशार्‍यावर त्या पक्षातून बाहेर पडल्याने राज्यातील नव्या बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर रोहन कॉंग्रेसमध्ये जाणार नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे. हे अपेक्षित होतेच, कारण ज्या प्रकारे कॉंग्रेसमध्ये महत्त्वाचे व तातडीचे निर्णय घेण्याबाबत धरसोड चालली आहे ते पाहता अशा पक्षाच्या भरवशावर स्वतःची राजकीय कारकीर्द पणाला लावायची की नाही याचा फेरविचार रोहनसारख्या उमेदवाराला करावासा वाटला यात नवल नाही.
रोहन यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय जवळजवळ घेतला होता व आपल्या समर्थकांना पक्षात आधी पाठवले होते, तेव्हा राजकीय परिस्थिती फार वेगळी होती. कॉंग्रेस गोवा फॉरवर्डला सोबत घेऊन भाजपला आव्हान निर्माण करील. शक्य असेल तर मगो आणि तृणमूलशीही जागांबाबत समझोता करील आणि भाजपला सत्तेवरून पायउतार करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही अशी रोहन यांची अपेक्षा होती. मात्र, कॉंग्रेसमध्ये गोवा फॉरवर्डशी युतीवरून जे अंतर्गत रणकंदन सुरू झाले ते पाहताच रोहन यांचा पार भ्रमनिरास झाला असावा.
दिल्लीला एकीकडे दिगंबर कामत व विजय सरदेसाई राहुल गांधींची भेट घेऊन युती झाल्याचे जाहीर करीत असताना दुसरीकडे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मात्र युती झालेली नाही आणि होणार नाही हे ठासून सांगतात. पक्षाचे पी. चिदंबरम यांच्यासारखे नेतेही एकीकडे त्याला दुजोरा देतात आणि दुसरीकडे दिनेश गुंडुराव विजय यांच्याशी वाटाघाटी सुरू ठेवतात ही कॉंग्रेसी विसंगती बोलकी आहे. एकीकडे कॉंग्रेसची ही धरसोड चाललेली असताना दुसरीकडे भाजपाने आपल्यापुढील यावेळचे मोठे आव्हान विचारात घेऊन विरोधकांनाच निवडणुकीपूर्वी जवळ ओढायचे जबरदस्त प्रयत्न सुरू केले. जयेश साळगावकर, रवी नाईक आणि इतर काही बडे मोहरे भाजपच्या हाती लागणार असल्याचे जेव्हा स्पष्ट झाले तेव्हा राज्यातील समीकरणे बदलू लागल्याची जाणीव रोहन यांना झाली यात नवल नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या दावणीला स्वतःला जखडून घेणे राजकीयदृष्ट्या हानीकारक आहे हे उमगलेल्या रोहन यांनी वेगळा विचार करायला सुरूवात केली.
आता प्रश्न येतो रोहन यांचे पुढचे पाऊल काय असेल? आपण अपक्ष म्हणूनच आगामी निवडणूक लढविणार असल्याचे ते सांगत आहेत. परंतु सद्यपरिस्थितीत अशा प्रकारे अपक्ष म्हणून निवडणूक लढविणे किती कठीण आहे याची त्यांनाही पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे ते आता पुढचे पाऊल काय उचलतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकापरीने कॉंग्रेसपासून फारकत घेऊन रोहन यांनी स्वतः आता सौदेबाजीला उपलब्ध असल्याचे संकेतच दिलेले आहेत. भाजपला विनेबिलिटी असलेले मोहरे हवे आहेत, कारण मागच्या आयारामांच्या भरवशावर येणारी निवडणूक जिंकणे शक्य नाही हेच सर्व पाहणी अहवाल सांगत आहेत. त्यामुळे प्लॅन बी भाजपने मैदानात उतरवला आहे. मात्र, रोहन भाजपवासी होण्यात काही अडचणी आहेत. ज्या प्रकारे भाजपने त्यांना आजवर वागवले. गरजेच्या वेळी सत्तेत सामील होऊनही काही कारण नसताना ज्या अपमानास्पद प्रकारे मंत्रिपदावरून हकालपट्टी केली, इतकेच नव्हे, तर त्याहीपुढे जात नंतर विधानसभा सत्र सुरू असताना रातोरात अटक केली, तो अपमान केवळ राजकीय सोईसाठी रोहन विसरतील की त्याचा सूड उगवू पाहतील हेे लवकरच कळेल.
कॉंग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यातील युती बिनसल्यात जमा आहे. त्यामुळे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांची प्रतिष्ठाही धुळीला मिळाली आहे, कारण दिल्लीत राहुल गांधींच्या उपस्थितीमध्ये हात उंचावून युतीचे संकेत दिले जाऊनही युती होत नाही याचा अर्थ त्यांची विजयसाठीची सारी मध्यस्थी फोल ठरली असाच त्याचा सरळसरळ अर्थ होतो. अशा वेळी स्वतः दिगंबरच कोणता निर्णय घेणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे गोवा फॉरवर्डचे जयेश साळगावकर भाजपवासी झाल्यामुळे आणि विनोद पालयेकर यांच्याबाबत स्वतः विजयच साशंक असल्याने गोवा फॉरवर्डच्या सौदेबाजीचा पायाच ढासळला आहे. स्वतः विजय सोडल्यास गोवा फॉरवर्डचे गोव्यात काय अस्तित्व आहे? त्यामुळेच कॉंग्रेसने त्यांना एक तर आमच्या पक्षाच्या तिकिटावर फातोर्ड्यातून लढा व अन्य ठिकाणच्या आमच्या उमेदवारांना पाठिंबा दर्शवा असा पर्याय दिला आहे. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विजयच्या भरवशावर तृणमूलचा हात सोडून कॉंग्रेसच्या आसर्‍याला येऊ पाहणारे प्रसाद गावकर यांच्यापुढेही आता पेच निर्माण होईल. रोहनने पाठ फिरवणे हा कॉंग्रेससाठी नक्कीच मोठा झटका आहे.