रोमांचक आयपीएल अंतिम मुकाबले

0
132
  • सुधाकर रामचंद्र नाईक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएल कार्यकारिणीने गेल्या रविवारी आयपीएल वेळापत्रक घोषित केले असून गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांत अबुधाबी येथे शनिवार दि. १९ रोजी होणार्‍या लढतीने आयपीएलच्या तेराव्या पर्वाचा शुभारंभ होईल.

बीसीसीआयची प्रतिष्ठेची तथा लोकप्रिय इंडियन प्रिमियर लीग टी-२० स्पर्धा अखेर सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेअखेर, येत्या १९ सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू होत आहे. ‘कोरोना महामारी’च्या उद्रेकानंतर उद्‌भवलेल्या भयकंपित परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अनिश्‍चिततेच्या वातावरणाअखेर बीसीसीआयच्या आयपीएल कार्यकारिणी मंडळाने ऑगस्टच्या प्रारंभास संयुक्त अरब अमिरातमधील दुबई, अबुधाबी आणि शारजाह येथील तीन सुसज्ज, अद्ययावत स्टेडियमस्‌वर इंडियन प्रिमियर लीगचे तेरावे पर्व आयोजित करण्याचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आयपीएल कार्यकारिणीने गेल्या रविवारी आयपीएल वेळापत्रक घोषित केले असून गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांत अबुधाबी येथे शनिवार दि. १९ रोजी होणार्‍या लढतीने आयपीएलच्या तेराव्या पर्वाचा शुभारंभ होईल. १० नोव्हेंबरपर्यंत चालणार्‍या या प्रतियोगितेत दहा ‘डबल हेडर’ असून दुपारचे सामने भारतीय वेळेनुसार ३.३० वा (यूएईत २ वा.) आणि सायंकाळी ७.३० (यूएईत ६ वा.) खेळविण्यात येतील. एकूण दुबईत २४, अबुधाबीत १२ आणि शारजात २० सामने खेळले जातील. ‘प्ले ऑफस्’ आणि ‘ड्रीम इलेव्हन आयपीएल फायनल’ची सामनास्थळे मात्र घोषित करण्यात आलेली नाहीत.

आठही फ्रँचाइजचे संघ आखाती प्रदेशात दाखल झाले असून सरावासही प्रारंभ झाला आहे. भारतीय क्रिकेटला नवे मानदंड मिळवून दिलेल्या, तसेच भारतातच नव्हे तर जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या इन्स्टंट क्रिकेट स्पर्धेच्या झळाळत्या चषकावर आतापर्यंत सहा संघांनी नाव कोरले असून अंबानी उद्योगसमुहाच्या मालकीच्या तथा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने सर्वाधिक चार वेळा ही प्रतिष्ठेेची प्रतियोगिता जिंकण्याचा मान मिळविला आहे. माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने तब्बल आठ वेळा या प्रतियोगितेची अंतिम फेरी गाठली, पण तीन वेळाच जेतेपद मिळविण्यात यश आले. भारतीय कर्णधार वीराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप ही प्रतियोगिता जिंकण्यात यश आलेले नाही. तथापि, यंदा आखातात स्पर्धा होत असल्याने तेथील हवामान आणि खेळपट्ट्यांचा आढावा घेता आरसीबी विद्यमान प्रतियोगिता जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार असेल असे आडाखे बहुसंख्य क्रीडापंडित व्यक्त करीत आहेत. २००८ मध्ये भारतात प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या आयपीएल प्रतियोगितेचे जेतेपद मिळविण्याचा मान ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने पटकावला होता. २००९ मध्ये प्रथमच भारताबाहेर द. आफ्रिकेत झालेल्या आयपीएलच्या दुसर्‍या पर्वाचे जेतेपद ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखालील डेक्कन चार्जर्सने पटकावले होते.
सहा महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेअखेर आखातात सुरू होणार्‍या इंडियन प्रिमियर लीगच्या आतापर्यंतच्या सुमारे एक तपाच्या कालखंडातील १२ प्रतियोगितांमधील विजेत्यांचा आढावा घेणे औत्सुक्याचे ठरावे.

२००८ : शुभारंभी इंडियन प्रिमियर लीगच्या बंगळुरूमधील शुभारंभी मुकाबल्याचा प्रारंभ कोलकाता नाइट रायडर्सचा सलामीवीर ब्रँडन मॅकलमने ७३ चेंडूत १० चौकार आणि १३ षटकारांच्या आतषबाजीत ठोकलेल्या झंझावाती नाबाद १५७ धावांच्या खेळीने झाला. २० षटकांच्या या इन्स्टंट क्रिकेटमध्ये अन्य नामवंत खेळाडूंनीही फलंदाजी-गोलंदाजीत आपले प्रावीण्य प्रगटविले. स्टेडियमस्‌वर चौकार, षटकारांचा पाऊस पडत गेला. युवा खेळाडूंनीही नामवंत आंतरराष्ट्रीय खेळाडूविरुद्ध आपले नैपुण्यकौशल्य प्रगटविले. ५९ सामन्यांच्या या झटपट प्रतियोगितेत बहुसंख्य नवखे खेळाडू नावारूपास आले आणि विशेष म्हणजे तो दोन महिन्यांचा कालखंड भारतीय क्रिकेटशौकिनांसाठी पर्वणीदायी ठरला. ऑस्ट्रेलियन फिरकी दिग्गज शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने अंतिम मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जवर ३ गडी राखून मात करीत सर्वप्रथम झळाळत्या आयपीएल चषकावर नाव कोरण्याचा मान प्राप्त केला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने प्रथम फलंदाजीत ५ बाद १६४ धावा केल्या तर प्रत्युत्तरात राजस्थानने ७ बाद १६४ धावा फटकावीत रॉयल विजय साकारला. ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू शेन वॉटसनने राजस्थान रॉयल्सच्या विजयात प्रमुख योगदान देताना ४७२ धावा आणि १७ बळी अशा शानदार कामगिरीसह ‘स्पर्धावीर’ किताबही प्राप्त केला.

२००९ : भारतातील सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आयपीएलचे दुसरे पर्व द. आफ्रिकेत खेळविण्यात आले. शुभारंभी प्रतियोगितेत विशेष चमक दर्शवू न शकलेल्या डेक्कन चार्जर्सने द. आफ्रिकेतील खेळपट्‌ट्यांवर विलक्षण कमाल दर्शविली आणि ऍडम गिलख्रिस्टच्या नेतृत्वाखाली जेतेपदाला गवसणी घातली. डेक्कन चार्जर्सने अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ६ धावांनी मात केली. डेक्कन चार्जर्सने प्रथम फलंदाजीत ६ बाद १४३ धावा केल्या आणि नंतर आरसीबीला ९ बाद १३७ धावांवर रोखीत जेतेपद प्राप्त केले. गिलख्रिस्टने कर्णधारपदास साजेशा मर्दुमकीत प्रतियोगितेत ४९५ धावा ठोकतानाच यष्टीमागे १८ बळीही घेत ‘स्पर्धावीर’ बहुमान पटकावला. तत्कालिन भारतीय युवा खेळाडू रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनीही डेक्कनच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

२०१० : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या तिसर्‍या पर्वाचे जेतेपद प्राप्त केले. धोनीसह ऑस्ट्रेलियन दिग्गज मायक हसी आणि मॅथ्यू हेडन यांनी चेन्नईच्या यशात प्रमुख योगदान दिले. चेन्नई सुपर किंग्जने अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सवर २२ धावांनी मात केली. चेन्नईने प्रथम फलंदाजीत ५ बाद १६८ धावा केल्या आणि नंतर मुंबईला ९ बाद १४६ धावांवर रोखले. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर तथा ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरने या प्रतियोगितेत सर्वाधिक ६१८ धावांसह ‘स्पर्धावीर’ किताब मिळविला. भारतीय फिरकीपटू प्रज्ञान ओझाने या स्पर्धेत सर्वाधिक २१ बळी घेतले.

२०११ : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसर्‍यांदा जेतेपद पटकावताना अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ५८ धावांनी मात केली. भारतीय सलामीवीर मुरली विजयने अंतिम मुकाबल्यात धडाकेबाज ९५ धावा चोपल्या तर अश्‍विनने १६ धावांत ३ बळी घेत चोन्नईच्या विजयात वाटा उचलला. चेन्नईने प्रथम फलंदाजीत ५ बाद २०५ धावांचे तगडे आव्हान खडे केले तर प्रत्युत्तरात बंगळुरूला ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल गाठता आली. वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने या पर्वात सहाशेहून अधिक धावा ठोकीत ‘स्पर्धावीर’ किताब मिळविला. मुंबई इंडियन्सचा श्रीलंकन द्रूतगती लसिथ मलिंगाने सर्वाधिक २८ बळी घेतले.

२०१२ : ‘बॉलिवूड सुपरस्टार’ शाहरूख खानच्या कोलकाता नाइटरायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचे ‘हॅट्‌ट्रिक’ जेतेपदाचे स्वप्न उधळवीत आयपीएल चषकावर नाव कोरले. उत्कंठावर्धक अंतिम मुकाबल्यात केकेआरने चेन्नईवर ५ गडी राखून मात केली. चेन्नईने प्रथम फलंदाजीत ३ बाद १९० धावांचा भक्कम पल्ला गाठला. १९१ धावांच्या उद्दिष्टाचा यशस्वी पाठलाग करताना द. केकेआरचा आफ्रिकन जॅक कॅलिसने (६९) अर्धशतक आणि उमद्या मनविंदर बिस्लाने जिगरबाज खेळीत ८९ धावा फटकावल्या. बिस्लाच्या या वीरोचित खेळीने चेन्नईच्या सुरेश रैनाची ३८ चेंडूवरील ७३ धावांची खेळी झाकोळली. कॅरेबियन स्टार ख्रिस गेलने सलग दुसर्‍या वर्षीही आपला धडाका जारी राखताना ७३३ धावा ठोकल्या, पण केकेआरच्या जेतेपदात प्रमुख योगदान दिलेला आणखी एक कॅरेबियन स्टार सुनिल नारायण ‘स्पर्धावीर’ किताबाचा मानकरी ठरला.

२०१३ : इंडियन प्रिमीयर लीगमधील सर्वात यशस्वी संघ, मुंबई इंडियन्सला तब्बल पाच वर्षांच्या प्रतीक्षेअखेर जेतेपद मिळविण्यात यश आले. ईडन गार्डन्सवरील रोमांचक अंतिम मुकाबल्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील, तथा सचिन तेंडुलकर, रिकी पॉंटिंगच्या मार्गदर्शनाखाली मुंबई इंडियन्सने अखेर सहाव्या प्रयत्नात आपले पहिले जेतेपद मिळविले. अंतिम फेरीत मुंबईने चेन्नईवर २२ धावांनी मात केली. मुंबईने प्रथम फलंदाजीत ९ बाद १४८ धावा केल्या आणि नंतर चेन्नईला ९ बाद १२५ धावांवर रोखले. रोहित शर्माला या प्रतियोगितेद्वारे यशस्वी टी-२० कर्णधार म्हणून नवी ओळख प्राप्त झाली. राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंवर झालेल्या ‘स्पॉटफिक्सिंग’च्या आरोपामुळे ही प्रतियोगिता काहीशी वादग्रस्तही ठरली.

२०१४ : सहाव्या पर्वात निराशादायी कामगिरीत सातव्या क्रमावर घसरलेल्या कोलकाता नाइटरायडर्सने या प्रतियोगितेत जिगरबाज पुनरागमनात, गटपातळीवर द्वितीय स्थान मिळविले आणि नंतर प्ले ऑफ तसेच अंतिम मुकाबल्यात किंग्ज इलेव्हन पंजाबवर मात करीत दुसर्‍यांदा जेतेपदाचा मान मिळविला. वृध्दीमान सहाच्या (११५) तडाखेबंद शतकामुळे पंजाबने प्रतिस्पर्ध्यांपुढे तगडे आव्हान खडे केले पण युवा मनिष पांडेने केवळ ५४ चेंडूत ७ चौकार आणि ६ षट्‌कारांच्या आतषबाजीत तडाखेबंद ९० धावा चोपीत केकेआरला ७ बाद २०० धावांचे लक्ष्य गाठून देत केकेआरला ३ गडी व तेवढेच चेंडू राखून विजय आणि जेतेपद मिळवून दिले.

२०१५ : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सला हे पर्व काहीसे नाट्यमय ठरले. या प्रतियोगितेत निराशाजनक प्रारंभात पहिल्या सहा सामन्यांत पाच वेळा पराभूत व्हावे लागले, पण लढवय्या रोहित आणि कंपनीने पुढील पाच सामने जिंकत आव्हान कायम राखले. पुढील सामन्यात परत एकदा त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूकडून हार पत्करावी लागली तरीही कच न खाता पुढील तीन सामने जिंकत अंतिम चार संघांत स्थान मिळविले आणि अखेर कोलकात्यातील अंतिम मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जवर ४१ धावांनी सनसनाटी विजय मिळवीत दुसर्‍यांदा जेतेपदाचा मान मिळविला. मुंबईने ५ बाद २०२ धावा चोपल्या आणि नंतर चेन्नईला ८ बाद १६१ धावांवर रोखले.

२०१६ : राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यावर लादण्यात आलेल्या दोन वर्षांच्या बंदीमुळे या प्रतियोगितेत गुजरात लायन्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट या दोन नव्या संघांना प्रवेश देण्यात आला. वीराट कोहलीने या प्रतियोगितेत तुफानी फटकेबाजीत चार शतकांसह ९७३ धावांचा पाऊस पाडला, पण अखेर अंतिम मुकाबल्यात त्याचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूला सनरायझर्स हैदराबादकडून ८ धावांनी पराभूत व्हावे लागले. सनरायझर्सने प्रथम फलंदाजीत ७ बाद २०८ धावा केल्या आणि नंतर बंगळुरूला ७ बाद २०० धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियन डेविड वॉर्नर आणि भारतीय सलामीवीर शिखर धवन यांनी सनरायझर्सच्या जेतेपदात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

२०१७ : मुंबई इंडियन्सने अंतिम मुकाबल्यात पुणे सुपरजायंटवर एका धावेने नाट्यमय विजय मिळवीत आपले तिसरे जेतेपद मिळविले. पुणे सुपरजायंटने प्रभावी गोलंदाजीत मुंबई इंडियन्सला २० षटकांत ८ बाद १२९ धावांवर रोखले. प्रारंभापासून घसरगुंडी घडलेल्या मुंबईला कृणाल पांड्याच्या ३८ चेंडूवरील ४७ धावांमुळे सव्वाशेचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरात पुणे सुपरजायंटने १ बाद ७१ अशी दमदार सुरुवात केली पण अंतिमक्षणातील नाट्यमय कलाटणीत द्रूतगती मिशेल जॉन्सनने अंतिम षटकात तीन महत्त्वपूर्ण बळी घेत पुणे सुपरजायंटसला ६ बाद १२८ धावांवर रोखीत मुंबई इंडियन्सला धावेने थरारक विजय आणि तिसर्‍या जेतेपदाचा मान मिळवून दिला.
२०१८ : दोन वर्षांच्या बंदीनंतर परतलेल्या चेन्नई सुपर किंग्जने दमदार पुनरागमनात तिसर्‍यांदा आयपीएल जेतेपदाचा मान मिळविला. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईने प्राथमिक फेरीत दमदार कामगिरीत द्वितीय स्थान मिळविले आणि प्रवेशपात्रता फेरीत सनरायझर्स हैदराबादवर मात करीत सातव्यांदा अंतिम फेरी गाठली. सनरायझर्सने दुसरी प्रवेशपात्रता लढत जिंकली. अंतिम फेरीत चेन्नई आणि हैदराबाद संघ पुन्हा आमने सामने ठाकले पण ऑस्ट्रेलियन शेन वॉटसनच्या ५७ चेंडूवरील धुवांधार ११७ धावांवर, धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने १७९ धावांचे लक्ष्य केवळ २ गडी गमावून साधीत तिसर्‍यांदा आयपीएल चषकावर नाव कोरले. हैदराबादच्या ६ बाद १७८ धावांच्या प्रत्युत्तरात चेन्नईने २ बाद १८१ धावा ठोकल्या.

२०१९ : अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अंतिम मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्जवर केवळ एका धावेने मात करीत मुंबई इंडियन्सने चौथ्यांदा आयपीएल अजिंक्यपदाचा मान मिळविला. प्रथम फलंदाजी केलेल्या मुंबई इंडियन्सचे आघाडीतील फलंदाज विशेष प्रभाव दर्शवू शकले नाहीत. क्विंटन डी कॉक (२९), रोहित शर्मा (१५), सूर्यकुमार यादव (१५), इशान किशन (२३) हे मोठी खेळी करण्यात असफल ठरले. पोलार्डने मात्र धीरोदात्त खेळीत २५ चेंडूत ४१ धावा चोपीत मुंबईला ८ बाद १४९ धावांचा टप्पा गाठून दिला. प्रत्युत्तरात शेन वॉटसनच्या तडाखेबंद ८० धावांनंतरही अंतिम षटकातील नाट्यमय घडामोडीत चेन्नईला २० षटकांत ७ बाद १४७ पर्यंतच मजल गाठता आली आणि मुंबईने धावेच्या थरारक विजयासह सर्वाधिक चार वेळा जेतेपदाचा मान मिळविला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा
फलंदाज फ्रँचाइज सामने धावा कारकीर्द
वीराट कोहली आरसीबी १६९ ५४१२ २००८-२०१९
सुरेश रैना सीएसके जीएस १८९ ५३६८ २००८-२०१९
रोहित शर्मा डीसी, एमआय १८३ ४८९८ २००८-२०१९
डेविड वॉर्नर डीडी, एसआरएच १२६ ४७०६ २००८-२०१९
शिखर धवन डीसी, एमआय, एसआरएच १५८ ४५७९ २००८-२०१९

आयपीएलमध्ये सर्वाधिक वैयक्तिक बळी
गोलंदाज फ्रँचाइज सामने बळी कारकीर्द
लसिथ मलिंगा एमआय १२२ १७० २००८-२०१७, २०१९.
अमित मिश्रा डीसी, डीडी, एसआरएच १४७ १५७ २००८|२०१९.
हरभजन सिंग एमआय, सीएसके १५७ १५० २००८|२०१९.
पियुष चावला केइपी, केकेआर, सीएसएच १५६, १५० २००८|२०१९.

सर्वोच्च वैयक्तिक खेळी
फलंदाज, फ्रँचाइज धावा प्रतिस्पर्धी
ख्रिस गेल आरसीबी १७६ (६६) पुणे वॉरिरयर्स २०१३.
ब्रँडन मॅकलम केकेआर १५८ (७३) आरसीबी २००८.
एबी डिविलियर्स आरसीबी १३३ (५९) मुंबई इंडियन्स २०१५.

आयपीएल विजेते उपविजेते
२००८ : राजस्थान रॉयल्स चेन्नई सुपर किंग्ज
२००९ : डेक्कन चार्जर्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२०१० : चेन्नई सुपर किंग्ज मुंबई इंडियन्स
२०११ : चेन्नई सुपर किंग्ज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू
२०१२ : कोलकाता नाइटरायडर्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१३ : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१४ : कोलकाता नाइटरायडर्स किंग्ज इलेव्हन पंजाब
२०१५ : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज
२०१६ : सनरायझर्स हैदराबाद रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
२०१७ : मुंबई इंडियन्स रायझिंग पुणे सुपरजायंट
२०१८ : चेन्नई सुपर किंग्ज सनरायझर्स हैदराबाद
२०१९ : मुंबई इंडियन्स चेन्नई सुपर किंग्ज