रोप वे साठी जीटीडीसीचा चंग

0
88

>> नदीत एकाही खांबाविना प्रकल्पाची तयारी

मांडवी नदीत एकही खांब न उभारता पणजी ते रेईश मागुस या दरम्यान रोप वे उभारण्यात येणार असल्याचे गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सीआर्‌झेड्‌ने पणजी ते रेईश मागुस या दरम्यानच्या रोप वे ला परवानगी नाकारल्याच्या पार्श्‍वभूमीवर आम्ही मांडवी नदीत एकही खांब न उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मांडवीच्या तीरी पणजीच्या दिशेने व रेईश मागुस किल्ल्याच्या दिशेने खांब उभारून ह्या रोप वे ची सोय करण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले. पणजीच्या दिशेने मांडवी नदीच्या काठावर ४० मीटर एवढ्या ऊंचीचे खांब रोप वे साठी उभारण्यात येतील. तर रेईश मागुस किल्ल्याच्या दिशेने टेकडी असल्याने तेथे केवळ ११ मीटर ऊंचीचे खांब उभारावे लागणार असल्याचे काब्राल यांनी स्पष्ट केले.

आम्ही आता ह्या रोप वे साठी मांडवी नदीत खांब न उभारण्याचा निर्णय घेतलेला असल्याने आता ह्या प्रकल्पाला सीआरझेड्‌ची हरकत असण्याचे कारण नसल्याच काब्राल यांनी स्पष्ट केले. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळातर्फे हा रोप वे प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. मात्र, सीआर्‌झेड्‌ने किनारपट्टी भागातील काही प्रस्ताविक प्रकल्पांबरोबरच ह्या रोप वेलाही हरकत घेतली होती. ह्या पार्श्‍वभूमीवर आता नदीत खांब न उभारता हा प्रकल्प पुढे नेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे काब्राल यांनी काल सांगितले.