रोड शो साठी १४ कोटी रु. खर्चून काय मिळवले?

0
117

विरोधकांकडून पर्यटनमंत्री धारेवर
गोवा पर्यटन खात्याने विदेशात आंतरराष्ट्रीय व्यापारी मेळावे व रोड शो यांवर गेल्या दोन वर्षांच्या काळात १४ कोटी रु. खर्च केल्याच्या प्रश्‍नावरून काल विरोधी आमदारांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांना धारेवर धरून हे व्यापारी मेळावे व रोड शो यातून काय निष्पन्न झाले ते सांगण्याचा हट्ट धरला. मंत्री दिलीप परुळेकर यांनी हे व्यापारी मेळावे व रोड शोमुळे गोव्यात पर्यटकांचा आकडा साडेबारा टक्क्यांनी वाढल्याचा दावा केला.
यासंबंधीचा मूळ प्रश्‍न आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासाला उपस्थित केला होता. पर्यटनमंत्री, सचिव तसेच पर्यटन खात्यातील अन्य अधिकारी यांनी १ मार्च २०१२ ते आतापर्यंत किती विदेश दौरे केले असा प्रश्‍न रेजिनाल्ड यांनी उपस्थित केला होता.
पर्यटन खात्याने गेल्या दोन अडीच वर्षांच्या काळात विदेशात व्यापारी मेळावे व रोड शो यांवर १४ कोटी खर्च केल्याच्या प्रश्‍नावरून कॉंग्रेस आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांच्यावर प्रश्‍नांचा भडीमार केला. सदर प्रश्‍नावरून पर्यटन खात्यावर टीका करताना विजय सरदेसाई यांनी पर्यटन खात्याने विदेश दौर्‍यांवर खर्च केलेले १४ कोटी रु. पाण्यात गेल्याचा आरोप केला. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स म्हणाले की हा मोठा घोटाळा आहे.
यावेळी स्पष्टीकरण देताना मंत्री दिलीप परुळेकर म्हणाले की या दौर्‍यांवर खर्च केलेले पैसे फुटक गेलेले नाहीत. या पैशांतून गोव्याच्या पर्यटनाविषयी विदेशातील लोकांना माहिती देण्यात आली. परिणामी राज्यात पर्यटकांचा आंकडाही वाढल्याचे ते म्हणाले. आपण जे दौरे केले त्यापैकी काही दौर्‍यांची आखणीही मागील सरकारनेच करून ठेवलेली होती, अशी माहितीही पर्यटनमंत्र्यांनी दिली.
यावेळी आरोप करताना विजय सरदेसाई म्हणाले की मागच्या सरकारने केलेल्या खर्चापेक्षा आता या दौर्‍यांवर दुप्पट खर्च करण्यात आला आहे. यावर उत्तर देताना परुळेकर म्हणाले की तेव्हा डॉलरचे दर कमी होते. आता ते बरेच वाढले आहेत. त्याशिवाय पूर्वी व्यापारी मेळाव्यांसाठी २५ ते ३० चौ. मी. जागा मिळत असे. आता ४५ चौ. मीटरपासून ८० चौ. मीटरपर्यंत जागा घ्यावी लागते. त्यामुळे जागेसाठीचा खर्च वाढला असल्याचे ते म्हणाले.
हे मेळावे व रोड शो आयोजित करण्यासाठीचे कंत्राट आपल्या मर्जीतील लोकांना देऊन परुळेकर यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप यावेळी विजय सरदेसाई यांनी केला. दिलीप परुळेकर यांनी त्यांना घोटाळ्याचे आरोप सिध्द करण्याचे आव्हान दिले. यावेळी हस्तक्षेप करताना सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी विजय सरदेसाई यांना त्यांच्याकडे घोटाळ्यासंबंधीचे पुरावे असतील तर ते सभागृहापुढे सादर करण्याची सूचना केली.