मेळाव्यात १० हजार उमेदवारांचा प्रत्यक्ष सहभाग
कामगार आयुक्त गांवस यांची माहिती
राज्य सरकारच्या कामगार आणि रोजगार खात्याने ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये आयोजित केलेल्या दोन दिवसीय रोजगार मेळाव्याला भरघोस प्रतिसाद लाभला. या रोजगार मेळाव्यातून खासगी कंपन्यांनी नोकरीसाठी आत्तापर्यंत सुमारे ५०० उमेदवारांची निवड केली असून सुमारे ४८०० उमेदवारांची नावे पुढील सोपस्कारांसाठी शॉर्टलिस्ट केली आहेत, अशी माहिती कामगार व रोजगार आयुक्त राजू गावंस यांनी रोजगार मेळाव्याच्या समाप्तीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
कामगार व रोजगार आयुक्त कार्यालयाने आयोजित या रोजगार मेळाव्याला मंगळवारी सुरुवात करण्यात आली होती. या रोजगार मेळाव्याची काल संध्याकाळी सांगता झाली.
या रोजगार मेळाव्यासाठी सुमारे २१ हजारांपेक्षा जास्त उमेदवारांनी नोंदणी केली होती. तसेच, मेळाव्यात खासगी क्षेत्रातील १५५ कंपन्यांनी सहभाग घेतला. तसेच, १० ते १५ कंपन्यांनी ऐनवेळी रोजगार मेळाव्यात सहभागी घेऊन उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
सुमारे १० हजार उमेदवारांनी प्रत्यक्षरीत्या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला आहे. काही उमेदवारांनी पूर्वनोंदणी न करता रोजगार मेळाव्यात सहभाग घेतला. या रोजगार मेळाव्याबाबत सविस्तर माहिती तयार करण्याचे काम केले जातआहे, असे कामगार आयुक्त गावंस यांनी सांगितले.
या रोजगार मेळाव्यात सहभागी कंपन्यांनी घेतलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीबाबत पाठपुरावा केला जाणार आहे. रोजगार मेळाव्यासाठी तयार करण्यात आलेल्या ऍपवर खासगी कंपन्यांकडून उमेदवारांची निवड व इतर माहिती अपलोड केली जात आहे. या रोजगार मेळाव्यात फार्मा, आयटी, हॉस्पिटालिटी, बँकिंग-विमा या क्षेत्रातील कंपन्यांमधील नोकर्यांसाठी उमेदवारांची संख्या जास्त होती, असेही कामगार आयुक्त गावंस यांनी सांगितले.