दिल्ली कॅपिटल्सने काल शुक्रवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील २३व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ४६ धावांनी पराभव केला.
शिमरॉन हेटमायरच्या आक्रमक खेळीला मार्कुस स्टोईनिसच्या अष्टपैलूत्वाची जोड लाभल्यानंतर रबाडा व अश्विन या कसलेल्या गोलंदाजांच्या बळावर दिल्लीने हा विजय साकार केला. दिल्लीने विजयासाठी समोर ठेवलेल्या १८५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा डाव १३८ धावांत संपला. या विजयासह दिल्लीने १० गुणांसह गुणतक्त्यात अव्वल क्रमांक मिळविला.
विजयासाठी १८५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची अपेक्षित सुरुवात झाली नाही. जोस बटलर अपयशी ठरला तर अननुभवी यशस्वी जैसवालच्या कुर्मगती फलंदाजीमुळे स्टीव स्मिथ व संजू सॅमसन ही दुकली दबावामुळे बाद झाली. मधल्या फळीत राहुल तेवतियाने २९ चेंडूंत ३८ धावा जमवत पराभवाचे अंतर कमी केले. रबाडाने सुरेख मारा करताना ३ गडी बाद केले. अनुभवी रवी अश्विनने ४ षटकांत केवळ २२ धावा देत २ बळी घेताना धावगतीवर अंकुश राहणार याची दक्षता घेतली. राजस्थानचा डाव १९.४ षटकांत १३८ धावांत संपला.
तत्पूर्वी, राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली. राजस्थानने या सामन्यासाठी अंकित राजपूत व टॉम करन यांना बाहेर बसवत वरुण ऍरोन व अँडी टाय यांना संधी दिली. दिल्लीच्या डावाची सुरुवात चांगली झाली नाही. आर्चरच्या गोलंदाजीवर धवन ‘शॉर्ट मिडविकेट’वर झेल देत माघारी परतला. दुसरा सलामीवीर शॉ याने दोन चौकार व षटकारासह वेगवान प्रारंभ केला होता. पण, आर्चरला ‘पूल’ करण्याच्या नादात तो झेलबाद झाला. कर्णधार अय्यर बाद झाला त्यावेळी फलकावर ५० धावा लागल्या होत्या. स्थिरावत असताना पंत स्वतःच्या चुकीमुळे धावबाद झाला. आघाडी फळीतील प्रमुख खेळाडू तंबूत परतल्याने राजस्थानने सामन्यावर पूर्ण पकड मिळवली होती. दहाव्या षटकांत दिल्लीची ४ बाद ७९ अशी स्थिती होती. स्टोईनिस व शिमरॉन हेटमायर यांनी यानंतर फटकेबाजी केली. हेटमायरने केवळ २४ चेंडूंत ५ षटकारांसह ४५ धावा चोपत दिल्लीला सुस्थिती गाठून दिली. स्टोईनिसने त्याला तोलामोलाची साथ देताना ४ षटकारांसह ३० चेंडूंत ३९ धावा जमवल्या. हर्षल व अक्षर पटेल या तळातील फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिल्याने दिल्लीला ८ बाद १८४ धावांपर्यंत पोहोचता आले.
धावफलक
दिल्ली कॅपिटल्स ः पृथ्वी शॉ झे. व गो. आर्चर १९, शिखर धवन झे. जैसवाल गो. आर्चर ५, श्रेयस अय्यर धावबाद २२, ऋषभ पंत धावबाद ५, मार्कुस स्टोईनिस झे. स्मिथ गो. तेवतिया ३९, शिमरॉन हेटमायर झे. तेवतिया गो. त्यागी ४५, हर्षल पटेल झे. तेवतिया गो. आर्चर १६, अक्षर पटेल झे. बटलर गो. टाय १७, कगिसो रबाडा नाबाद २, रविचंद्रन अश्विन नाबाद ०, अवांतर १४, एकूण २० षटकांत ८ बाद १८४
गोलंदाजी ः वरुण ऍरोन २-०-२५-०, जोफ्रा आर्चर ४-०-२४-३, कार्तिक त्यागी ४-०-३५-१, अँडी टाय ४-०-५०-१, श्रेयस गोपाळ २-०-२३-०, राहुल तेवतिया ४-०-२०-१
राजस्थान रॉयल्स ः यशस्वी जैसवाल त्रि. गो. स्टोईनिस ३४, जोस बटलर झे. धवन गो. अश्विन १३, स्टीव स्मिथ झे. हेटमायर गो. नॉर्के २४, संजू सॅमसन झे. हेटमायर गो. स्टोईनिस ५, महिपाल लोमरोर झे. अक्षर गो. अश्विन १, राहुल तेवतिया त्रि. गो. रबाडा ३८, अँडी टाय झे. रबाडा गो. अक्षर ६, जोफ्रा आर्चर झे. अय्यर गो. रबाडा २, श्रेयस गोपाळ झे. हेटमायर गो. हर्षल २, कार्तिक त्यागी नाबाद २, अवांतर १, एकूण १९.४षटकांत सर्वबाद १३८
गोलंदाजी ः कगिसो रबाडा ३.४-०-३५-३, ऍन्रिक नॉर्के ४-०-२५-१, रविचंद्रन अश्विन ४-०-२२-२, हर्षल पटेल ४-०-२९-१, अक्षर पटेल २-०-८-१, मार्कुस स्टोईनिस २-०-१७-२