>> विजयाच्या स्थितीतून सनरायझर्स हैदराबादचा निसटता पराभव
नवदीप सैनी व शिवम दुबे यांनी ‘डेथ ओव्हर्स’मध्ये केलेल्या अचूक मार्याच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने काल सोमवारी सनरायझर्स हैदराबादचा १० धावांनी पराभव केला. इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या मोसमातील हा तिसरा सामना दुबई स्पोर्टस् सिटी मैदानावर खेळविण्यात आला. बंगलोरने विजयासाठी ठेवलेल्या १६४ धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ १९.४ षटकांत १५३ धावांत आटोपला.
बंगलोरच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा कर्णधार वॉर्नर सुरुवातीलाच ‘नॉन स्ट्राईक’वर धावबाद झाला. बॅअरस्टोव व मनीष पांडे यांनी यानंतर दुसर्या गड्यासाठी ७१ धावांची भागीदारी केली. डावातील सोळाव्या षटकात हैदराबादचा संघ २ बाद १२१ अशा मजबूत स्थितीत होता. शेवटच्या ३० चेंडूंत त्यांना विजयासाठी अवघ्या ४३ धावा हव्या होत्या व त्यांचे ८ गडी शिल्लक होते. परंतु, चहलने टाकलेल्या सोळाव्या षटकात सामना बंगलोरच्या बाजूने काहीसा झुकला. या षटकात चहलने स्थिरावलेल्या बॅअरस्टोवला व विजय शंकरला तंबूचा रस्ता दाखवला. १७व्या षटकात दुबेने नवोदित गर्गचा काटा काढला. अभिषेक शर्मादेखील याच षटकात धावबाद झाला. हैदराबादला या लागोपाठच्या धक्क्यांनंतरही राशिद खान व भुवनेश्वर कुमारकडून खूप अपेक्षा होती. पण, सैनीने १८व्या षटकात या दोघांचा त्रिफळा उडवत बंगलोरच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब केले. जायबंदी असलेला मिचेल मार्श १९व्या षटकात फलंदाजीस उतरला. मोठे फटके खेळण्याचा त्याचा इदारा होता. पण, त्याला भोपळाही फोडता आला नाही.
तत्पूर्वी, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने नाणेफेक जिंकून बंगलोरला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. नवोदित देवदत्त पडिकल व ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरोन फिंच यांनी आरसीबीच्या डावाची सुरुवात केली. डावखुर्या पडिकलने मुक्तपणे खेळ दाखवत ४२ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. आयपीएल पदार्पणात अर्धशतक झळकावणारा तो सॅम बिलिंग्स (२०१६) याच्यानंतरचा दुसरा खेळाडू ठरला. तर २०१० साली केदार जाधवनंतरचा पहिलाच भारतीय. आरसीबीकडून श्रीवत्स गोस्वामी याने २००८ साली पदार्पणाच्या लढतीत अर्धशतक ठोकले होते. पडिकल व फिंच यांनी पहिल्या गड्यासाठी ११ षटकांत ९० धावांची सलामी दिली. पहिल्या दहा षटकांअखेर बंगलोरचा संघ बिनबाद ८६ अशा दमदार स्थितीत होता. या दोघांनी रचलेल्या भक्कम पायावर कळस रचण्यात बंगलोरची मधली फळी कमी पडली. कर्णधार कोहली केवळ १४ धावा करू शकला. डीव्हिलियर्सने ३० चेंडूंत ५१ धावांची धीरोदात्त खेळी केली. परंतु, आरसीबीला निर्धारित २० षटकांत ५ बाद १६३ धावांपर्यंतच पोहोचता आले. भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या डावातील शेवटच्या षटकात बंगलोरला केवळ ८ धावा जमवता आल्या. या षटकात त्यांनी डीव्हिलियर्स व दुबे यांनादेखील गमावले.
बंगलोरने या सामन्यासाठी ऍरोन फिंच, डेल स्टेन, एबी डीव्हिलियर्स व यष्टिरक्षक फलंदाज जॉश फिलिपे या विदेशींना संधी दिली. मोईन अलीसारखा फिरकी गोलंदाजी करणारा तर १० कोटी रुपये मोजून घेतलेला जलदगती मारा करणारा अष्टपैलू ख्रिस मॉरिस असताना बंगलोरने फिलिपे याला दिलेली संधी भुवया उंचावणारी ठरली. आरसीबीने या सामन्यात देवदत्त पडिकल याला आयपीएल पदार्पणाची संधी दिली. हैदराबादने अपेक्षप्रमाणे कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह, जॉनी बॅअरस्टोव व राशिद खान यांना निवडले. अफगाणिस्तानचा अष्टपैलू मोहम्मद नबी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांना बाहेर बसवून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा मध्यमगती मारा करणारा अष्टपैलू मिचेल मार्श याला निवडले. दुर्देवाने जायबंदी झाल्याने त्याला केवळ ४ चेंडू टाकता आले.
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ः देवदत्त पडिकल त्रि. गो. शंकर ५६ (४२ चेंडू, ८ चौकार), ऍरोन फिंच पायचीत गो. अभिषेक २९, विराट कोहली झे. राशिद गो. नटराजन १४, एबी डीव्हिलियर्स धावबाद ५१ (३० चेंडू, ४ चौकार, २ षटकार), शिवम दुबे धावबाद ७, जॉश फिलिपे नाबाद १, अवांतर ५, एकूण २० षटकांत ५ बाद १६३
गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ४-०-२५-०, संदीप शर्मा ४-०-३६-०, थंगरसू नटराजन ४-०-३४-१, मिचेल मार्श ०.४-०-६-०, विजय शंकर १.२-०-१४-१, राशिद खान ४-०-३१-०, अभिषेक शर्मा २-०-१६-१
सनरायझर्स हैदराबाद ः डेव्हिड वॉर्नर धावबाद ६, जॉनी बॅअरस्टोव त्रि. गो. चहल ६१ (४३ चेंडू, ६ चौकार, २ षटकार), मनीष पांडे झे. सैनी गो. चहल ३४, प्रियम गर्ग त्रि. गो. दुबे १२, विजय शंकर त्रि. गो. चहल ०, अभिषेक शर्मा धावबाद ७, राशिद खान त्रि. गो. सैनी ६, भुवनेश्वर कुमार त्रि. गो. सैनी ०, संदीप शर्मा झे. कोहली गो. स्टेन ९, मिचेल मार्श झे. कोहली गो. दुबे ०, थंगरसू नटराजन नाबाद ३, अवांतर १५, एकूण १९.४ षटकांत सर्वबाद १५३
गोलंदाजी ः डेल स्टेन ३.४-०-३३-१, उमेश यादव ४-०-४८-०, नवदीप सैनी ४-०-२५-२, वॉशिंग्टन सुंदर १-०-७-०, युजवेंद्र चहल ४-०-१८-३, शिवम दुबे ३-०-१५-२