रेव्ह पार्टीच्या आयोजकाचे सत्ताधार्‍यांशी लागेबांधे ः खंवटे

0
144

>> खासदार पुत्राची भागिदारी उघड

काही दिवसांपूर्वी रेव्ह पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे संबंध राज्यातील प्रमुख राजकीय नेत्यांशी असून हवाला, अमली पदार्थ व्यवहार, क्रिकेट सट्टेबाजी आदींमध्ये त्याचा सहभाग असल्याचा आरोप काल पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्य सरकारचा या गुन्हेगारांना पाठिंबा असून या लोकांनी स्थापन केलेल्या काही कंपन्यांमध्ये स्थानिक नेत्यांचे जवळचे नातलग भागीदार असल्याचा घणाघातही श्री. खंवटे यांनी यावेळी केला. आरोपीशी संबंधित व्यक्तींचा एक क्रिकेट संघ असून तो कॅनडामध्ये होणार्‍या क्रिकेट लीगमध्ये सहभागी होत असतो. तेथे बहाण्याने क्रिकेटवर सट्टा चालतो.

गोव्यातील एका खासदाराने या क्रिकेट संघात पैसे गुंतवले असून त्या खासदाराचा मुलगा सदर आरोपी व साथीदारांच्या दोन कंपन्यांमध्ये भागीदार असल्याचा गौप्यस्फोट करीत त्याचा तपशीलही सादर केला.