>> अधिकार्यांची पहाणी, सरकारने नकार दिल्यास प्रकल्प दुसरीकडे नेण्याची तयारी
कासावलीतील नागरिकांनी घरे पाडण्यात येणार असल्यामुळे रेल्वे दुपदरीकरणास विरोध दर्शवला. त्यामुळे काल पहाणी करण्यासाठी आलेले दक्षिण पश्चम रेल्वेचे सरव्यवस्थापक अजयकुमार सिंग यांनी, स्थानिकांना जर दुपदरी रेल्वेमार्ग नको असेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. राज्य सरकारने हिरवा कंदील दाखविल्याने आम्ही दुपदरीकरणाचे काम हाती घेत आहोत, जर उद्या राज्य सरकारला दुपदरी रेल्वे मार्ग नको असेल तर आम्ही सदर प्रकल्प दुसरीकडे नेऊ असे स्पष्ट केले.
दुपदरीकरणामुळे कासावली भागातील शेकडो जुनी घरे पाडावी लागणार असल्याने कासावली भागातून नेण्यात येणार्या दुपदरीकरणाला आमचा विरोध आहे. तेथील लोक आपल्या जुन्या घरांसंबंधी संवेदनशील असल्याने सदर दुपदरीकरणासाठी दुसरा पर्याय पहावा असे कुठ्ठाळीच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा यांनी यावेळी सांगितले.
अजयकुमार सिंग हे वास्को रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी रविवारी सायंकाळी आले होते. याप्रसंगी त्यांच्यासमावेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे होते. यावेळी श्रीमती साल्ढाणा व कासावलीच्या सरपंच मार्था साल्ढाणा यांनी अजयकुमार यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कासावलीतून नेण्यात येणार्या दुपदरीकरणासंबंधी चर्चा केली. याप्रसंगी राज्य किंवा केंद्र सरकारने सदर दुपदरीकरण प्रकल्प थांबविण्यास सांगितला तर आम्ही तो जबरदस्तीने पुढे नेऊ शकत नसल्याचे सिंग यांनी सांगितले. कोणताही प्रकल्प हाती घेताना शेकडो, हजारो वर्षांपूर्वीची बांधकामे मोडावी लागतात. झाडे कापावी लागतात. त्याला पर्याय नसतो असे सांगून श्री.सिंग यांनी, बंगलुरू येथे रेल्वेमार्ग विस्तारीकरण करताना हजारो बांधकामे हटवावी लागल्याचे सांगितले. रस्त्यासाठी तुम्ही जागा देता मग रेल्वेला विरोध का असाही सवाल त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, कासावली येथील बांधकामे पाचशे वर्षापूर्वीची वारसा स्थळे आहेत. त्या घरांभोवती लोकांच्या भावना गुंतल्या आहेत. आमचा विकासाला विरोध नाही. तथापि येथे दुपदरीकरण रेल्वे मार्ग लोकांच्या दारातून जात आहे. गोवा हे लहान राज्य आहे. त्यामुळे दुपदरीकरण करताना कासावलीच्या घरांचा विचार करण्याची गरज आहे, असे साल्ढाणा यांनी श्री. सिंग यांना सांगितले.